शिक्षणमंत्री दीपक केसरकर:सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन …
⚡सावंतवाडी ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणली. भविष्यात तंत्रज्ञानयुक्त युवा पिढीची जगाला गरज आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी जगाचे नेतृत्व करणार आहे. तुम्हा मुलांमध्ये ती ताकद नक्कीच आहे. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करणं हे आपलं कर्तव्य असून मुलांनी विज्ञान व तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घ्या व जगाचे नेतृत्व करा, असा सल्ला राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
दरम्यान, विज्ञान हा आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. मात्र, महाराष्ट्रातील मुलं ही नेहमी विज्ञान गणित व भाषा या विषयांमध्ये कमी पडताना दिसतात. त्यामुळे या विषयांमध्ये मुलांची प्रगती व्हावी यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई राज्य विज्ञान शिक्षण संस्था
प्रादेशिक विद्या प्रशिक्षण, रविनगर, नागपूर
विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग आणि कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
