मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील स का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, प्रा. डॉ. मुरलीधर मनोहर जावडेकर (वय- ८५) यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने काल मंगळवारी रात्री निधन झाले. डॉ. मुरलीधर जावडेकर यांचा जन्म २० मे १९३६ रोजी अलिबाग- रायगड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदापूर – पुणे येथे तर माध्यमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालय पुणे येथे झाले. पुणे येथील स.प. महाविद्यालयातून मराठी व इंग्रजी विषयातून बी.ए. पदवी प्राप्त केल्यावर पुणे विद्यापीठातून एमए पदवी प्राप्त केली. शिक्षकी पेशाकडे वळत डॉ. जावडेकर १९६० मध्ये वर्धा येथील गो. से. वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर १९६५ ते १९६७ या काळात त्यांनी चिपळूण येथील दातार बेहेरे जोशी महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केली. त्यानंतर १९६७ साली मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक नोकरीत रुजू झालेल्या डॉ. जावडेकर यांनी मे १९८० प्राचार्य बनले व १९९३ मध्ये ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले महाराष्ट्रातील वैज्ञानिक क्रांती या विषयावर त्यांनी पीएचडी करत डॉक्टरेट मिळवली. जावडेकर यांनी आपल्या जीवनात २५ पुस्तकेही लिहिली. अंतिम सत्य, ‘अवतार’ आणि इतर कथा (बालसाहित्य), आग लागो या सगळ्याला, किलर इन्स्टिंक्ट (कादंबरी), केशवसुत गातचि बसले !, केशवसुत : वैदिक संस्कृतीचा आधुनिक उद्गाता, गजराज आणि वनराज, केशवसुत समीक्षा, नव्या युगाच्या कविता, निम्मी माझी निम्मी तुझी, प्रीती मिळेल का हो?, मस्तानीचा बाजीराव, महाराष्ट्रातील वैज्ञानिक क्रांती, वैज्ञानिक समीक्षा, शुभ मंगल! विज्ञान !, सत्तेचा विजय असो! (नाटक). साहित्यातील प्रीती आणि भक्ती (समीक्षा ), सुनामीची सुवर्णसंधी (कादंबरी), हिंदू समाजाचा छेदाभ्यास आदी विविध पुस्तके लिहित साहित्यात आपले योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी , चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
माजी प्राचार्य डॉ. मुरलीधर जावडेकर यांचे निधन
