गुरूदास गवंडे;पशुधन घटण्यास अधिकारी, लोकप्रतिनिधीच जबाबदार
*💫बांदा दि.११-:* केवळ जिल्हा बँकेच्या निवडणुका समोर ठेवून दुध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्याचा दुध उत्पादक संघ असताना बाहेरील दुध डेरी जिल्ह्यात आणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. जिल्ह्यात अशा दुध संघांना आणण्यासाठी सहाय्य करणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहतील अशांना या निवडणुकीतून शेतकऱ्यांनी हद्दपार करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गुरूदास गवंडे यांनी केले आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे ते म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ‘त्या’ दोन डेरीने जी थकबाकी रक्कम केली आहे ती जिल्हा दुध उत्पादक संघ सिंधुदुर्ग यांनी वसुल करावी. जिल्ह्यात पशुधनात घट झाली त्याला येथील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आज इन्सुली सारख्या गावामध्ये कोट्यवधींची इमारत बांधून त्या ठिकाणी जर पशुवैद्यकिय अधिकारी नसतील तर अशी इमारत बांधून तरी उपयोग काय असा सवाल गुरूदास गवंडे यांनी केला आहे. शासनाचा कोट्यवधीचा निधी याठिकाणी खर्च केला जातो. कागदावर आकडे दाखविले जातात, परंतु प्रत्यक्ष मात्र कृती नाही. त्यामुळे आज जिल्ह्यातील पशुधन घट झाली आहे. कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गायी, म्हैसी घेतल्या होत्या. दुधही मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून दुध पुरवठा केला होता. परंतु काही डेऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आणली. त्यामुळे दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास उडाला. जिल्ह्याचा दुध उत्पादक संघ असताना अन्य बाहेरून संघ आणण्याची काय गरज आहे. त्यामुळे सुशिक्षित आणि आपल्याला काम करणारे, शेतकऱ्यांचे हित जपणारे उमेदवार निवडून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त असलेले पशुवैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, औषधे, गायी-म्हैसीना लागणारे खाद्य जर उपलब्ध झाले तर पशुधन घट होऊच शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करावा, असे आवाहन गवंडे यांनी केले आहे.
