⚡मालवण ता.०३-:
आचरा बाजारपेठ ते आचरा तिठा कावळे दुकानाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पुजारेवाडी येथील युवकांनी श्रमदानातून स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
आठवडा बाजार तसेच इतर दिवशी बाजारपेठ, देवूळवाडी आणि परिसरातील नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, झुडपे आणि वेली वाढल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण झाल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता.
ही समस्या लक्षात घेऊन पुजारेवाडीतील युवकांनी पुढाकार घेत श्रमदानातून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडपे व वेली हटवून रस्ता स्वच्छ केला. या उपक्रमामुळे रस्ता वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित झाला असून नागरिकांनी युवकांच्या सामाजिक जाणिवेचे आणि कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे.
या श्रमदान मोहिमेत रुपेश पुजारे, शरद पवार (बंडो), आनंद पेंडूरकर, रामचंद्र पुजारे, राहुल पुजारे, दुर्गेश पुजारे, रितेश पुजारे, अमोल गुरव, मनोज पुजारे, विघ्नेश पवार, यश पाल, अक्षय पुजारे, हरीश परब, हर्षद पेंडूरकर, जय घाडी, रुद्र घाडी आदी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
