शेर्ले दुकानवाडी ते नदीपर्यंत रस्ता धोकादायक

⚡बांदा ता.१९-: मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांना बांदा बाजारपेठ गाठण्यासाठी जवळचा असलेला शेर्ले दुकानवाडी ते नदी पर्यंतचा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. प्रशासन दरबारी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. निदान यावर्षी तरी रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तातो पावसकर यांनी केली आहे.


आरोस, मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांना बांदा बाजारपेठ गाठण्यासाठी शेर्ले कापाईवाडा येथून जवळचा मार्ग आहे. सुमारे अडीच किलोमीटर अंतर कमी होत असल्याने मोठ्या संख्येने या मार्गाने वाहतूक होते. आठ दिवसांपूर्वी दुचाकींचा खड्डे वाचवताना अपघात झाला सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र धोका कायम आहे.
ग्रामपंचायत प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करण्यात आली. मात्र आश्वासन व्यतिरिक्त काही मिळाले नाही. बांदा तेरेखोल नदीवर पूल झाल्याने यामार्गे वाहतूक वाढली आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी व वेळ वाचविण्यासाठी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी तातो पावसकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page