चंद्रशेखर बावनकुळे हे सुपर वॉरियर्स बैठक, घर चलो अभियान, व चौकसभाही घेणार…

आम.नितेश राणे:वरिष्ठ नेतेमंडळी ठरवतील त्या उमेदवाराला खासदार करणार..

⚡कणकवली ता.१७-: रत्नागिरी सिंधदुर्गचा खासदार महायुतीचे वरिष्ठ नेतेमंडळी एकत्रित बसून ठरवितील. मात्र, जो उमेदवार ठरविला जाईल, त्याचे सर्वांनी मिळून एकत्रित काम करून निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे असे आम.नितेश राणे यांनी सांगितले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महाविजय २०२४ अंतर्गत १९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे सुपर वॉरियर्स बैठक, बाजारपेठेत घर चलो अभियानांतर्गत जनसंपर्क, तर शहरात चौकसभाही होणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

कणकवली येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवासेना जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, संतोष कानडे आदी उपस्थित होते.

आम. नितेश राणे म्हणाले,१९ रोजी दु. ३ वा. चंद्रशेखर बावनकुळे हे खारेपाटण येथे येणार आहेत. तेथे त्यांचे भव्य स्वागत होणार आहे. त्यानंतर ३.३० वा. भगवती मंगल कार्यालयात सुपर वॉरियर्स बैठक होणार आहे. ४.३० वा. ते भालचंद्र महाराजांचे दर्शन घेऊन ५ वा. शहरात ढालकाठी ते नवरात्रोत्सवापर्यंत घर चलो अभियानांतर्गत व्यापारी, जनता यांच्याशी संपर्क साधत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ६ वा. चौकसभा होणार असून सायंकाळी ७.१५ वा. ते सावंतवाडी विधानसभा संपर्क कार्यालयाचे सावंतवाडी येथे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते गोव्याकडे रवाना होणार आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तिनही विधानसभांचे प्रमुख, तसेच प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास योजनेचे प्रमुख बाळा भेगडे, केशव उपाध्ये, संदीप लेले, महेश जाधव आदी मान्यवर असणार आहेत.

लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष राज्यभर दौरा करत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक खासदार देण्याचे निश्चित केलेले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदारही महायुतीच्या माध्यमातून निवडून देऊन मोदींच्या कामाला हातभार लावण्यासाठी पाठवावयाचा आहे. आतापर्यंतच्या खासदारांने जनहिताचे कोणतेही काम केलेले नाही. ते २०१४ ते २०१९ या कालावधीत सत्तेत होते. पण काहीच करू शकले नाहीत. राज्यात सत्ता असतानाही त्यांनी काही केले नाही. त्यामुळे आता या मतदारसंघातील जनतेनेच आपला विकास करणारा, रोजगार निर्माण कराारणार, गावागावात विकास पोहोचविणारा व देश महासत्ता बनविण्यासाठी हातभार लावणारा खासदार निवडून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार असल्याचे श्री. राणे म्हणाले.
गगनबावडा घाट रस्त्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण स्वत: लक्ष घालून आहेत. त्यामुळे पावसाळा संपताच हे काम सुरू हाईल. तसेच चिपळूणची घटना दुदैवी आहेत. असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page