जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे प्रतिपादन; जिल्हा परिषद या उपक्रमाला विधायक सहकार्य करेल*
सिंधुदुर्गनगरी, दि. १०: जागरुक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था स्वत:हून प्रशासनाच्या मदतीला येत असतील तर सर्वसमावेशक विकास अधिक वेगाने होऊ शकेल. ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या माध्यमातून होत असलेले आरोग्यविषयक काम प्रशंसनीय असून या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासनाचे विधायक सहकार्य राहील. ‘मिशन’सोबत एप्रिलमध्ये बैठक घेऊन सविस्तर चर्चा करु, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासंदर्भात जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व जागरुक नागरिकांनी स्थापन केलेल्या ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळाने श्री. नायर यांची नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांना मिशनची माहिती दिली, त्यावेळी ते बोलत होते. या शिष्टमंडळात ‘आधार फाऊंडेशन’चे सचिव नंदन वेंगुर्लेकर, ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, सामाजिक कार्यकर्ते विनायक मेस्त्री, निखिल सिद्धये उपस्थित होते. शिष्टमंडळाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन श्री. नायर यांचे स्वागत करण्यात आले. *‘मिशन’ हा विधायक उपक्रम : प्रजित नायर* समाजातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्था एका महत्वाच्या प्रश्नावर एकत्र येऊन प्रशासनासोबत समन्वयाने काम करु इच्छितात, हा मिशनचा उपक्रमच विधायक आहे, असे सांगून श्री. नायर यांनी या व्यासपीठाच्या संकल्पनेबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, मी नुकताच या जिल्हयात रुजू झालो आहे. पालघरसारख्या भागात काम केल्याने मला ग्रामीण भागातील समस्यांची कल्पना आहे. विभागवार आढावा घेण्याचे कामही मी सुरु करीत आहे. ‘मिशन’सोबत एप्रिल महिन्यात व्यापक बैठक घेऊन त्यावेळी सविस्तर चर्चा करुन जे प्रश्न माझ्या अखत्यारीत आहेत, ते सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. एप्रिलमधील बैठकीवेळी विविध विषय व समस्यांनुसार स्वयंस्पष्ट नेमके प्रस्ताव आणावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. सेवाभावी वृत्तीने स्थापन केलेल्या ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’ संकल्पनेचे कौतुक करुन त्यांनी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. *मिशन हे अराजकीय व्यासपीठ: नंदन वेंगुर्लेकर* यावेळी ‘आधार फाऊंडेशन’चे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी श्री. नायर यांना ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’ची संकल्पना सांगितली. ते म्हणाले की, प्रशासनाशी संघर्ष न करता समन्वय ठेवुन जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सुविधांना चालना देणे, प्रशासनाला मदत करणे व सर्वसामान्य नागरिकाला आरोग्य सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे या हेतुने हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. प्रशासनाच्या काही अडचणी असु शकतात, याची आम्हाला जाणीव आहे. प्रशासनात हस्तक्षेप करण्याचा आमचा अजिबात उद्देश नाही. उलट मदतीची भुमिका आहे. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत. यासाठी विविध संवर्गातील कर्मचारी संघटनांशी आम्ही संपर्क केला असुन त्यांच्या न्याय्य अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे आग्रह धरणार आहोत. याशिवाय डीएफसी, आयएमए, नॅब अशा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या संस्था आहेत. त्यांचे योगदानही याकामी घेण्यात येणार आहे. *सद्याच्या यंत्रणेचा आढावा घ्यावा : सतीश लळीत* जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि नव्याने सुरु झालेली आरोग्यवर्धिनी केंद्रे हा जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा आहे, असं सांगून ‘घुंगुरकाठी’ स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत म्हणाले की, ग्रामीण भागात आजही या केंद्रांना खुप महत्व आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा ही एक मोठी समस्या आहे. एमबीबीएस अधिकाऱ्यांच्या ७६ पदांपैकी फक्त २२ पदे भरलेली आहेत. आरोग्य सेवक (पुरुष) ही ४५ पदे, तर आरोग्य सेविका (महिला) ही ४६ पदे रिक्त आहेत. एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तीन चार आरोग्य केंद्रांचा कार्यभार सोपवलेला आहे. याचबरोबर सद्या अस्तित्वात असलेल्या प्रा. आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करण्याचीही गरज आहे. ही केंद्रे जेव्हा सुरु झाली, तेव्हा लोकसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी दूर अंतरावरील गावे जोडण्यात आली. आता याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. दुर्गम भागात भौगोलिक अंतर लक्षात घेऊन काही नवी प्रा. आरोग्य केंद्रे सुरु करण्याचीही आवश्यकता आहे. आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका म्हणून जीप देण्यात आल्या आहेत. तथापि, अनेक ठिकाणच्या रुग्णवाहिका निर्लेखित झाल्या आहेत. या सर्वाचा आढावा घेण्याची विनंती त्यांनी केली. *तदर्थ नियुक्त्यांचा प्रश्न सोडवा: गणेश जेठे* सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे म्हणाले की, जिल्ह्यात बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची तदर्थ नि
