महान कतृत्वाचे ‘सहकाररत्न’ पी.एफ. डॉन्टस…

⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे, माजी सैनिकांचे नेतृत्व करणारे, ज्यांचा उल्लेख ‘सहकाररत्न म्हणून केला जातो ते पी. एफ. डॉन्टस आज आपणांत नाहीत. शनिवार दि. ७ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी संघर्ष करताना, ‘राज्यसरकारी कर्मचाऱ्याचा आवाज हा लाखो कर्मचाऱ्यांचा असून तो मोठाच असणार’ असे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना ठासून सांगणारा आवाज आज स्तब्ध झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अनेकांनी अनेक संस्था स्थापन केल्या. पण त्या संस्था नीटपणे चालविणारी नेतेमंडळी ही हाताच्या बोटावरच मोजण्याएवढी आहे. डॉन्टस यांनी २५ ते ३० संस्था स्थापन केल्या. त्या सर्व संस्था आजपर्यंत अस्तित्वात असून आपले कार्य जोमाने करीत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या विशेषत: ‘सैनिक नागरी सहकारी पतसंस्था’, ‘कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी’, ‘सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सहकारी पतसंस्था, ओरोस ह्या संस्था आज जिल्ह्यातील अग्रणी संस्था म्हणून मानल्या जातात. त्याचे श्रेय पी. एफ. डॉन्टस यांनाच जाते.

पी. एफ. डॉन्टस यांचे महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडीच्या पंचम खेमराज महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांची सैन्य दलात भरती झाली. सैन्यदलातील शिस्त त्यांच्या नसानसांमध्ये भरली होती. सैन्य दलातील कोअर ऑफ सिग्नल यंत्रणेमध्ये ते कार्यरत होते. सुवर्णमंदिरामध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी अतिरेक्यांविरोधात कारवाई केली तेव्हा पंजाब राज्यात सिगल यंत्रणेत ते कार्यरत होते. १९८३ सालात ते सैन्य दलातून निवृत्त होउन सावंतवाडीत आले. त्यानंतर त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग या कार्यालयात नोकरीस प्रारंभ केला. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या होत्या. त्याला वाचा फोडण्यासाठी र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्त्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पदाची जबाबदारी डॉन्टस यानी घेतली. त्या काळात कर्मचाऱ्यांचे अनेक मोर्चे, आंदोलने काढून त्यांनी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.

पी.एफ. डॉन्टस जरी सरकारी नोकरीत रुजू झाले असले, तरी त्यांच्यातील सैनिक हा जागृत होता. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक समस्या त्यांना भेडसावू लागल्या. त्यामुळे त्यांनी माजी सैनिकाना संघटित करून, माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक मोर्चे, निवेदने, सभा, शिबीरे, मेळावे घेत त्यांनी माजी सैनिकांनी शासनाशी संघर्ष केला. ‘इंडियन एक्स- सर्व्हिसेस लिग’ या संघटनेचे ते सलग १० वर्षे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते तर १५ वर्षे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष होते. या पदाचे सोने करून त्यानी वन रैंक वन पेन्शन, घरफाळा माफी असे माजी सैनिकाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. माजी सैनिकांसाठी हक्काचे अर्थसहाय्य करणारी संस्था असावी या उद्देशातून त्यांनी

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना दि. ०५ ऑगस्ट १९९१ रोजी केली. या माध्यमातून माजी सैनिक, सैनिक व सैनिकांच्या पत्नी यांच्यासाठी आकर्षक कर्ज योजना, त्याचप्रमाणे खास महिलांसाठी हिरकणी कर्ज योजना, रौप्य धन योजना सुरु केल्या असून त्यामुळे माजी सैनिकांना हक्काचे आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले आहे. संस्थेने गेल्या ३२ वर्षांत उतुंग प्रगती केली असून या पतसंस्थेचे आजचे खेळते भागभांडवल रु २१० कोटी आहे. संस्थेच्या जिल्ह्यात एकूण २० शाखा आहेत.

कोकणातील विद्यार्थी हा हुशार असून त्याला सैन्य दलात व शासनामध्ये अधिकारी बनावे हा हेतू समोर ठेवून पी. एफ. डॉन्टस यांनी तत्कालीन खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या सहकार्याने ऑक्टोबर २००३ मध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली या मिलीटरी पॅटर्नच्या शाळेची स्थापना केली. १००% यशाचा आंबोली पॅटर्न अशी ओळख आज संपूर्ण महाराष्ट्रात या शाळेची आहे. या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज सैन्यदलात व शासनामध्ये व विविध कंपन्यामध्ये मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत.

हे सारे करीत असतानाच त्यांनी आपल्या ख्रिश्चन बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना ६ ऑक्टोबर १९९४ रोजी केवळ ३५ हजार रुपये भांडवलातून सुरू केली. आज या संस्थेचे खेळते भागभांडवल २२५ कोटी रुपये आहे. या संस्थेच्या जिल्ह्यात ६ शाखा असून प्रशस्त असे मुख्यालय कार्यालय सावंतवाडीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेकडो ख्रिस्ती बंधू भगीनीना नोकल्या मिळाल्या असून, हजारो बेरोजगारांना रोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत असताना जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी सहकारी पतसंस्था ओरोस या पतसंस्थेची स्थापना डॉन्टस यांनी २० जानेवारी १९८८ रोजी केली. अंदाजे ३ हजार सदस्य असणाऱ्या या पतसंस्थेच्या स्थापनेच्या वेळी २८ हजार रूपये भांडवल होते. आज या संस्थेचे खेळते भागभांडवल १३० कोटी इतके आहे. पाहिजे तेव्हा कर्ज मिळणारी हक्काची पतसंस्था म्हणून जिल्ह्यातील कर्मचारी या पतसंस्थेकडे पाहतात.

डॉन्टस यांचे सहकारातील कार्य उत्तुंग आहे. सहकाराबरोबरच त्यांनी पत्रकारक्षेत्रात प्रवेश करून ‘साप्ताहिक सरहद्द’ हे साप्ताहिक २००८ मध्ये सुरू केले. स्वतः संपादक असलेले हे त्यांचे साप्ताहिक गेली १५ वर्षे सातत्याने प्रकाशित होत आहे. डॉन्टस यांनी अनेक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना ‘सहकारत्न’ दिल्ली येथील ‘ज्वेल ऑफ इंडिया’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. कॉंग्रेस प्रांतिकचे ते सदस्य होते. ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांचे ते विश्वासू सहकारी होते. कॉंग्रेस पक्षाने राजापूर लोकसभेची उमेदवारी सुधीर सावंत यांना दिल्यावर पी. एफ. डॉन्टस यांनी प्रचारासाठी पुरा जिल्हा पिंजून काढला होता. सुधीर सावंत यांच्या खासदारकीमध्ये डॉन्टस यांचा मोलाचा वाटा आहे. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपणांत नाहीत. त्यांच्या कार्यास सलाम.

You cannot copy content of this page