मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी हिंमत आवश्यक…

कॅ. आशुतोष आपंडकर: मर्चंट नेव्ही मार्गदर्शन शिबिर संपन्न..

⚡मालवण ता.११-: मर्चंट नेव्हीमध्ये करियरच्या अनेक संधी असून या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या गावातून बाहेर पडण्याची गरज आहे. विविध देशांमध्ये जाण्याची व मर्चंट नेव्हीमध्ये कर्तृत्व दाखवण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन कॅप्टन आशुतोष आपंडकर यांनी येथे बोलताना केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲंड ॲग्रीकल्चर, ट्रेनिंग शीप रहमान आणि मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मराठी व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये मर्चंट नेव्ही विषयक मार्गदर्शन सत्राचे संपन्न झाले. त्यावेळी कॅ. आपंडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष दिपक मुळीक – परब, प्रमुख मार्गदर्शक वक्ते कॅप्टन डॉ. आशुतोष आपंडकर, कॅ. सचिन कांबळे, कॅ. अश्विनी देशमुख, कॅ. मनिषा कोडे, शशांक कोडे, सुभाष मयेकर, बांदेकर व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर कुशे व संस्थेचे सदस्य विजय केनवडेकर, प्रभारी प्राचार्य कैलास राबते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय केनवडेकर यांनी केले. प्रारंभी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष दिपक मुळीक – परब यांचा उत्कृष्ट उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मधील उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेचे सचिव चंद्रशेखर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी आशिष पेडणेकर यांनी विचार मांडत कोकणातील विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या करियरसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कुशे यांनी संस्थेच्या कार्याची व महाविद्यालयाची उपस्थितांना ओळख करून दिली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक कॅ. आशुतोष आपंडकर यांनी मर्चंट नेवीचे स्वरूप, परीक्षा पद्धती, उमेदवाराची पात्रता, मर्चंट नेव्ही मधील करियरच्या संधी व टप्पे, तसेच विद्यार्थिनींसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी प्रेझेंटेशनद्वारे विवेचन केले. कॅ. सचिन कांबळे यांनी मर्चंट नेव्हीतील संधींचा फायदा घेताना कोणते गुण आवश्यक आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. मर्स्क या नामांकित शिपिंग कंपनीचे अधिकारी नितीन यांनी प्रशिक्षणाचे विविध टप्पे व मानधन याविषयी स्लाइड- शो माध्यमातून मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले. यावेळी शासकीय तंत्रनिकेतन मालवण, एम्. जी. बागवे काॅलेज मसुरे, रामभाऊ परूळेकर महाविद्यालयाचे व सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. स्नेहा बर्वे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page