⚡बांदा ता.११-: ‘सहज ट्रस्ट’च्या वतीने जाहीर करण्यात आलेले मानसिक आरोग्य पुरस्कार हे या आजाराचा सामना करणारे सदाशिव जाधव व रुग्णाचे नातेवाईक मनीषा ठाकूर यांना डॉ. स्नेहल गोवेकर यांच्या हस्ते नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
अशा प्रकारचा पुरस्कार भारतात आयपीएच, ठाणे यांच्यातर्फे द्विज पुरस्काराच्या स्वरूपात देण्यात येतो. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच अनोखा पुरस्कार आहे.
हा पुरस्कार केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख ५००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वेगवेगळ्या पातळ्यांवर विविध गटांमध्ये काम करत असताना मानसिक आरोग्याबद्दलची अनास्था, आजारांबद्दलचं दुर्लक्ष, अज्ञान आणि उपचारांबाबत असलेली साशंकता यामुळे एकंदर बरं होण्याच्या प्रक्रियेत शास्त्रीयपणा राहत नाही. मानसिक आजारांना चिकटलेल्या कलंकित दृष्टिकोनामुळे आजारी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय समाजासमोर येणं टाळतात आणि त्यांच्या या समोर न येण्यामुळे मानसिक आजारातून बरं होता येतं हे लक्षात येत नाही. त्यामुळे पुन्हा कलंकित दृष्टिकोन जसाच्या तसा राहतो.
जेव्हा मानसिक आजारातून सावरणाऱ्या व्यक्ती समोर येतील तेव्हाच त्यांच्याबाबतचं अज्ञान, अनास्था, गैरसमज दूर होतील. आजाराचा सामना करणाऱ्या इतर रुग्णांना बरं होण्याची प्रेरणा मिळेल.
मानसिक आजार झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणं ही एक दीर्घकाळ चालणारी लढाई आहे. त्या लढाईत संपूर्ण कुटुंबाची ताकद खर्ची पडत असते. ती लढाई जिद्दीने पार पडणाऱ्या व्यक्तीचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं कौतुक होणं आवश्यक आहे.
मानसिक आरोग्य बिघडतं म्हणजेच व्यक्तिमत्वाच्या विचार भावना आणि वर्तन या तीन पैलूंमधील सुसूत्रता हरवते. ती पुन्हा मिळवण्याचा प्रवास म्हणजेच आरोग्याच्या दिशेने करायचा प्रवास. म्हणून या पुरस्काराचं नाव ‘विभाव : मानसिक आरोग्य पुरस्कार’ ठेवण्यात आले आहे.
‘सहज ट्रस्ट’ जे काम करत आहे, त्याची आपल्या समाजाला नितांत गरज आहे. औषधांची भूमिका मर्यादित असते. औषधांच्या जोडीने समुपदेशन आणि इतर मानसोपचार आवश्यक असतात. सहज ट्रस्ट सारख्या काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करणे, जागा आणि इतर सोयी पुरविणे, संस्थेची माहिती लोकांपर्यंत पोचवणे अशी मदत करणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचे काम आहे असे प्रतिपादन डॉ. गोवेकर यांनी यावेळी केले.
मानसिक आजार आपल्यापैकी कोणालाही आणि आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतो. मानसिक आजारांना समजून घेण्यासाठी आणि त्याने त्रस्त व्यक्ती आणि कुटुंबियांना समाजात सर्व प्रकारे सामावून घेण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग आणि योगदान वाढणे महत्वाचे आहे असे मत सहज ट्रस्ट च्या अध्यक्षा मानसोपचार तज्ज्ञ मीनाक्षी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
