⚡कणकवली ता.१०-: मे २०२३ मध्ये जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत ८६१ वी रँक मिळविणारा आणि अनंत आमुची ध्येयशक्ती असे म्हणत सध्या आयएसएस होण्याचे स्वप्न उरात बाळगून पुन्हा परीक्षेला सामोरे जाणारा एस एम ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी तुषार दिपक पवार याचा एस एम परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव श्री. डी. एम. नलावडे, मुख्याध्यापक जी.एन. बोडके, उप मुख्याध्यापक आर.एल प्रधान व शिक्षक एस आर लवंद, बी.बी. जाधवर व सौ. एम. आर. पाटील यांच्या उपस्थितीत हा कौटुंबिक सोहळा पार पडला.
माझ्या यशात कॉलेजची शिस्त आणि सर्व गुरुजनांचे मार्गदर्शन फार मोलाचे ठरले. त्यामुळेच यूपीएससी परीक्षेत संदर्भ देताना एस.एम.चा उल्लेख अभिमानाने केला असे प्रांजळ मत तुषार पवार याने सत्काराच्या वेळी व्यक्त केले.
या निमित्ताने सचिव श्री. डी. एम. नलावडे यांनी कणकवली सारख्या छोट्या गावातून युपीएससी परीक्षा पास होणे आणि सध्या भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा ग्रुप ए सर्व्हिस या पदावर सेवा बजावण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या तुषार पवार याचे मनापासून कौतुक केले. तसेच भविष्यात एस. एम. चा विद्यार्थी कलेक्टर झाला तर आम्हाला नेहमीच अभिमान वाटेल तेव्हा येणाऱ्या परीक्षेत उत्तुंग यश मिळावे यासाठी शुभेच्छाही दिल्या.
या सत्कार सोहळ्यात मुख्याध्यापक बोडके, प्रधान व सर्व शिक्षकांनी त्याचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
