⚡मालवण ता.०५-: मालवणहून वायरी येथील आपल्या घरी जात असताना अचानकपणे मोटरसायकलची धडक वायरी येथील हॉटेल साई माऊली नजिकच्या विद्युत खांबाला बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली गोट्या मसुरकर हे शिवसेना ठाकरे गटाचे वायरी भागाचे शाखाप्रमुख होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
यासंबधीचे अधिक वृत्त असे की वायरी भूतनाथ येथे ज्ञानेश्वर मसुरकर हे आपले दोन भाऊ व बहीण यांच्या समवेत राहत होते गवंडी काम करून आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालविणारे गोट्या मसुरकर हे कामानिमित्त बुधवारी मालवणात आले होते काम आटोपून ते आपल्या पॅशन मोटरसायकलने मालवणहून वायरीच्या दिशेने जात होते. त्यावेळी वायरी साई माऊली हॉटेल जवळील विद्युत खांबाला मोटारसायकलची धडक बसली. या अपघातात मसूरकर गंभीररित्या जखमी झाले. दीपक ढोलम, मनोज झाड, मंदार बोडवे, अवि सामंत यांनी त्याना रिक्षेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वायरी येथील स्मशानभूमीत गोट्या मसुरकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
