मालवण ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी मशीन उपलब्ध व्हावी…

सुरेश बापर्डेकर:राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी मागण्यांचा विचार करून आवश्यक उपकारणे व मशीन उपलब्ध कराव्यात,..

मालवण (प्रतिनिधी)

मालवण ग्रामीण रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन, एमआरआय आणि सोनोग्राफी मशीन ही उपकरणे त्वरित शासनाने आणि आरोग्यमंत्र्यांनी उपलब्ध करावीत,अशी मागणी तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबईचे सचिव सुरेश बापर्डेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

मालवण तालुक्यातील ग्रामीण भागातील एखाद्या बिकट प्रकृती बनलेल्हा रुग्णास सरकारी रुग्णालयात उपचार करतेवेळी एमआरआय किंवा सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी करण्याची गरज असते तेव्हा त्यांना कुडाळ किंवा कणकवली गाठावे लागते. या बाबी खर्चिक असल्याने गरीब सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना हे शक्य होत नाही. यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होऊन त्यांच्या उपचारात अडथळे येतात. यात रुग्णांच्या जीविताचे बरेवाईट होण्याची भीती असते, तसें झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असा सवाल सुरेश बापर्डेकर यांनी उपस्थित केला आहे.

मालवण ग्रामीण रुग्णालयात एक्सरेला लागणाऱ्या साहित्याचा अभाव दिसून येतो. ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव भासत असेल तर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात सर्व उपकरणासह त्याला लागणारे ऑपरेटर, अधिकारी, डॉक्टर उपलब्ध करावेत अशी मागणी सुरेश बापर्डेकर यांनी केली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री यांनी रुग्णांची होणारी गैरसोय व गरज लक्षात घेऊन आपण केलेल्या मागण्यांचा विचार करून मालवण ग्रामीण रुग्णालयात आवश्यक उपकारणे व मशीन उपलब्ध कराव्यात, असेही बापर्डेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page