⚡मालवण ता.०२-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व ट्रेनिंग शिप रेहमान पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि. ९ व १० ऑक्टोबर रोजी मर्चंट नेव्ही संदर्भात करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे, यामध्ये मर्चंट नेव्हीचे कोर्स, प्रशिक्षण व नोकरीच्या संधी याबाबत माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील हॉटेल कान्हा रसोई येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे आशिष पेडणेकर, विजय केनवडेकर, नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी आशिष पेडणेकर म्हणाले, कोकणातील माणसांचे समुद्राशी जवळचे नाते आहे. मात्र, समुद्राशी संबंधित क्षेत्रातील करियर संधीबाबत जागरूकता कमी दिसून येते. म्हणूनच मर्चंट नेव्ही सारख्या क्षेत्रात येथील समुद्राशी नाते असणाऱ्या युवकांना नोकरीची चांगली संधी असून त्यासाठी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता अकरावी, बारावी मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच आयटीआयचे शिक्षण घेणारे व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासाठी हे मार्गदर्शन आयोजित केले असून मर्चंट नेव्ही म्हणजे काय ? त्यातील असणाऱ्या अनेक करियर संधी व कोर्स, प्रवेश प्रक्रिया, नोंदणी, नोकरीच्या संधी, प्रशिक्षण याविषयी माहिती देण्यात येणार आहे. मर्चंट नेव्ही मध्ये मुलांबरोबर खास करून मुलींना असणाऱ्या विविध संधी बाबतही माहिती देण्यात येणार आहे. कॅप्टन डॉक्टर आशुतोष आपंडकर यांच्या नेतृत्वाखाली मर्चंट नेव्हीचे पाच कॅप्टन ची टीम यासाठी मार्गदर्शन करणार आहे. हा मार्गदर्शन कार्यक्रम दि. ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. सावंतवाडी आयटीआय, दुपारी २.३० वा. आयटीआय सिंधुदुर्ग नगरी, ओरोस, दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १०. ३० वाजता स.का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, दुपारी २.३० वा. कणकवली येथे होणार आहे. महाराष्ट्र चेंबर मार्फत मर्चंट नेव्ही बाबत दरवर्षी करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार असून कोकणातील मुलांना नोकरीची मोठी संधी मर्चंट नेव्ही मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, इच्छुक मुला मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आशिष पेडणेकर यांनी यावेळी केले.
तसेच आपल्या नेतृत्वाखाली हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या शुभारंभाला सावंतवाडी येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष डॉ. दीपक मुळीक परब, आयटीआय चे अधीक्षक अनिल मोहाळे, मुंबई विद्यापीठ सिनेट मेंबर लखमराज भोसले हे उपस्थित राहणार आहेत. चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत कार्यक्रमाचे नियोजन विजय केनवडेकर हे करत असून अधिक माहितीसाठी 9420206873 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आशिष पेडणेकर यांनी सांगितले.
