प्रशांत बांदेकर:महामार्ग विभागाकडे निवेदनद्वारे केली मागणी..
बांदा/प्रतिनिधी
बांदा-वाफोली रस्त्यावर कट्टा कॉर्नर येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने नाल्यासाठी घातलेले पाईप हे लहान असल्याने मोठ्या पावसात पाणी तुंबून लगतच्या वस्तीत व दुकानात शिरते. सध्या याठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरु असून महामार्ग विभागाने पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मोठे पाईप घालावेत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महामार्ग विभागाला लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या उड्डानपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बांदा वाफोली रस्त्याच्या बाजूला एक नाला असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा याच नाल्यातून होत असतो. परंतू या नाल्यासाठी वापरण्यात आलेले पाईप खूपच लहान असल्याने एक दोन तास जरी मोठा पाऊस पडला तरी या नाल्यातून पाणी योग्य प्रमाणात जात नाही. परीणामी पाणी रस्त्यावर येते व वाहतूक पूर्णपणे बंद होते. शिवाय आजूबाजूच्या दुकानांचे सुद्धा पाणी शिरून नुकसान होते.
सदर मोरीचे काम हे महामार्गचे काम करताना करण्यात आले होते. महामार्ग विभागाकडून याठिकाणी उड्डानपुलाचे काम सुरु आहे त्यामुळे याठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मोठे पाईप टाकण्यात यावे.
