*💫मालवण दि.०८-:* मालवण बंदर जेटी येथून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणी महंमद उर्फ मुन्नासाहेब लाल मुजावर याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने रविवारी कोल्हापूर येथे अटक केली. सुशांत शेलटकर याच्या चोरीस गेलेल्या दुचाकीतील मोबाईलच्या लोकेशनवरून या दुसऱ्या संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वी याच गुन्ह्यात रफिक शेख याला मालवण पोलिसांनी दुचाकीसह पकडले होते. त्याची पोलीस कोठडी आज संपुष्टात आली. रफिक शेख व महंमद मुजावर या दोघांना आज मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. मालवण बंदर जेटीवरून सुशांत शेलटकर (रा. दांडी) यांची पार्क करून ठेवलेली ऍक्टिवा दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर गाडीच्या तपासासाठी मालवण पोलिसांचे पथक कोल्हापूर येथे रवाना झाले होते. यावेळी रफिक शेख याला पोलिसांनी ऍक्टिवा गाडीसह पकडले होते. यातील दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू असतानाच सुशांत शेलटकर यांच्या गाडीतील चोरीस गेलेल्या मोबाईलच्या लोकेशनवरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला महंमद उर्फ मुन्नासाहेब लाल मुजावर हा संशयित कोल्हापूर येथे आढळून आला. त्याला आज मालवण येथे आणण्यात आले. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग, मालवण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक भारत फारणे यांच्यासह पो.हे.कॉ. पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर हे करत आहेत.
दुचाकी चोरीतील दुसऱ्या संशयितास अटक…
