डॉ. भुजंग बोबडे:पर्यटनातून विकास होताना निसर्गाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य..
⚡मालवण ता.२७-: कोणत्याही ठिकाणची नैसर्गिक स्थिती आणि पर्यावरण यावर तेथील संस्कृतीचा विकास होत असतो. आज पर्यटन वाढत असले तरी निसर्गाला बाधा पोहचवून पर्यटनाचा विकास होऊ शकत नाही. निसर्ग आणि आपला वारसा यांचे जतन करून पर्यटनाचा विकास साधला पाहिजे, असे आवाहन नागपूर येथील भारतीय शिक्षण मंडळाच्या ज्ञान संसाधन केंद्राचे संचालक डॉ. भुजंग बोबडे यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे पर्यटन सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.
मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि युवा टुरिझम क्लब यांच्यावतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘वारसा पर्यटन’ या संकल्पेवर आधारीत पर्यटन सप्ताहाचे आयोजन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन डॉ. भुजंग बोबडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद पंतवालावलकर, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेलकर, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, संदेश कोयंडे, ऍड. समीर गवाणकर, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. उज्वला सामंत आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. मान्यवरांचा परिचय सुमेधा नाईक यांना करून दिला. तर पर्यटन सप्ताहाच्या कार्यक्रमाची रूपरेषेबाबत प्रा. कैलास राबते यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना डॉ. भुजंग बोबडे म्हणाले, कोकणला भरभरून असा अतिशय सुंदर निसर्ग लाभला आहे. परंतु या सुंदर निसर्गाचे जतन करणे ही कोकणवासीयांची जबाबदारी आहे. पर्यटनातून विकास होताना निसर्गाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. येथे स्थापत्य कलेचा व सांस्कृतिक वारसा असून तोही जपला पाहिजे. कोकणचे किनारे स्वच्छ आहेत. परंतु हे किनारे आणखीन स्वच्छ व्हावेत यासाठी स्थानिकांनी जाणीवपूर्वक लक्ष देण आवश्यक आहे. तरच जास्तीत जास्त पर्यटक कोकणात येतील. प्रत्येक ग्रामस्थाला आपल्या गावाचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी शोधकवृत्ती बाळगणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
प्रांताधिकारी प्रशांत पानवेलकर म्हणाले, पर्यटन व्यवसायायात प्रत्येक घटकाचा हातभार असणे आवश्यक आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगात आज प्रत्येकाने अपडेट राहणे गरजेचे आहे. पर्यटन व्यावसायिक म्हणून काम करत असताना या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. एका पर्यटकाच्या भूमिकेतून आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ राहिल याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. तहसीलदार वर्षा झालटे यांनी पर्यटन दिनाच्या निमित्ताने महाविद्यालय पर्यटन सप्ताहाचा स्तुत्य उपक्रम राबवित असून या उपक्रमासाठी तहसील प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी बाबा मोंडकर, श्रीपाद पंतवालावलकर यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. उज्वला सामंत यांनी केले. आभार डॉ. एम. आर. खोत यांनी आभार मानले. यावेळी गुरु राणे, भाऊ सामंत, लक्ष्मीकांत खोबरेकर, ज्योती तोरसकर, दादा वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर, आनंद हुले, सुहास ओरसकर, अमेय देसाई यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
