Headlines

महिलांनी आव्हाने स्वीकारत प्रगती साधावी-: सौ. मेघना जोशी…

*💫मालवण दि.०८-:* आजच्या युगात महिलांसमोर दैनंदिन जीवनात वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. पुरुषांच्या बरोबरीने आणखी प्रगती साधायची असेल तर ही आव्हाने महिलांनी स्वीकारली पाहिजेत. महिलांनी आव्हाने स्वीकारून आपल्या जीवनात नवनवीन बदल घडवीत प्रगती केली पाहिजे असे प्रतिपादन मालवणच्या जय गणेश इंग्लिश स्कुलच्या माजी मुख्याध्यापिका व लेखिका सौ. मेघना जोशी यांनी भंडारी हायस्कुल येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या मेघना जोशी या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मेघना जोशी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या वसुधा गोवेकर, मुख्याध्यापक व्ही.जी. खोत, पर्यवेक्षक श्री. हणमंत तिवले, शिक्षिका सौ. एस. एस. सारंग, सौ. चव्हाण सौ मेस्त्री, सौ ए ए वाईरकर, सौ सारंग, सुनंदा वराडकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. सारंग यांनी केले. तर सौ. सरोज बांदेकर यांनी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी प्रशालेच्या वतीने कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षिकांचा कोरोना योद्धा म्हणून शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तर उपस्थित सौ. मेघना जोशी व वसुधा गोवेकर या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मेघना जोशी यांनी महिलांनी आव्हाने स्वीकारत प्रगती करावी. आव्हाने स्वीकारण्यास वयाचे कोणतेही बंधन नसते. मुलींनी, महिलांनी थोर व्यक्तींची चरित्रे वाचावी. मुलींच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे असे सांगितले. यावेळी वसुधा गोवेकर यांनी आजच्या मुली व महिलांनी मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या मोहजालात अडकू नये असे सांगितले. मोबाईल व सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टींसाठी, आपल्या प्रगतीसाठी वापर करावा असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक व्ही. जी. खोत यांनीही विचार मांडले. तर यावेळी विद्यार्थिनींनी देखील महिला दिनावर आधारित मनोगते सादर केली.

You cannot copy content of this page