गणेशोत्सवासाठी आलेले ७३९ भक्तांना किरकोळ आजार…

डाॅ.सई धुरी; जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केली तपासणी
१८ पथके होती कार्यरत

सिंधुदुर्गनगरी ता २०
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत गणेशोत्सव कालावधीत १८ आरोग्य पथकामार्फत करण्यात आलेल्या तपासणीत सर्दी खोकला, ताप, अतिसार व किरकोळ आजाराचे असे मिळून ७३९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णाला संदर्भ सेवा देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी आज दिली.

गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव होवू नये यासाठी १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेक पोस्ट असलेल्या १८ ठिकाणी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने कामानिमित्त जिल्ह्याबाहेर राहत असतात. मुंबई, पुणे आदी शहरांत राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे नागरिक गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्यात एस टी किंवा रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत असतात. मात्र, हे नागरिक ज्या शहरात कामानिमित्त राहत असतात. त्या ठिकाणी सुरु असलेला साथरोग त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात येवू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आरोग्य पथके नियुक्त करण्यात आली होती .
कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग या रेल्वे स्टेशनवर, मालवण, वेंगुर्ला, बांदा, कणकवली, देवगड, सावंतवाडी, कुडाळ बस स्थानक आणि आंबोली, फोंडाघाट, खारेपाटण, करूळ, इन्सुली, दोडामार्ग चेकपोस्ट अशा एकूण १८ ठिकाणी ही पथके कार्यरत ठेवली होती. पहाटे ८ ते दु. २, दु. २ ते रात्रो ८ अशा दोन सत्रात कार्यरत ठेऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. रेल्वे स्टेशन वरील पथके रेल्वे गाड्यांच्या वेळेनुसार तैनात ठेवण्यात आली होती.

१५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक ,चेक पोस्ट अश्या १८ ठिकाणी तपासणी करताना जिल्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांमध्ये जे रुग्ण आजारी दिसून आले अशा संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्दी खोकला असलेले ३७८ रुग्ण ,तापाचे ४८ रुग्ण, अतिसाराचे २८ रुग्ण तर किरकोळ आजारी २८५ रुग्ण असे मिळून ७३९ रुग्ण सापडले. त्यांना प्राथमिक औषध उपचार करून त्यांची नोंद करण्यात आली आहे. हे संशयित रुग्ण ज्या गावी जाणार आहेत त्या गावातील कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नियमित सर्वेक्षणात या रुग्णांना पुढील औषधोपचार दिला जाणार आहे.

४५ रक्त नमुने घेतले

जिल्ह्याबाहेरून जिल्ह्यात दाखल झालेल्या व तपासणीत आढळलेल्या तापाच्या ४५ संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेऊन जिल्हा रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच झालेल्या निदानानुसार त्यांना औषध उपचार सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी यांनी दिली.

You cannot copy content of this page