*💫बांदा दि.०८-:* कोरोना काळात गावावर संकट आले असताना ग्रामपंचायतीच्या खांद्याला खांदा लावून आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका हे काम करणारे सर्व अधिकारी महिला होते. त्यांनी कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर या ठिकाणी मात करण्यासाठी ग्रामपंचायतीला आणि गावाला सतत सहकार्य केले, असे प्रतिपादन निगुडे सरपंच समीर गावडे यांनी केले. निगुडे ग्रामपंचायतमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निगुडे सरपंच समीर गावडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पेडणे गोवा हायस्कूलचे माजी प्राध्यापक जगन्नाथ पंडित यांनी सावित्रीबाईंचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले,सावित्रीबाईंनी स्त्रीला शिक्षणाच्या पायावर उभे करून समाजात एक मोठे स्थान निर्माण करून दिले. त्याचमुळे आज भारत देशाच्या एक महिला राष्ट्रपती पंतप्रधान होऊ शकले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिलांना आरक्षण मिळाले म्हणून आज सर्वच क्षेत्रात महिलांना मोठे स्थान दिले जाते. अशा या ठिकाणी निगुडे ग्रामपंचायतीने हा सत्कार सोहळा महिलांचा आयोजित केला आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक डॉ.अमित भाग्यवंत, आरोग्यसेविका टी. ई. चव्हाण, आर. आर. शेनई, पोलीस पाटील सुचिता मयेकर, तलाठी भाग्यलक्ष्मी शिंदे, ग्रामसेविका तनवी गवस, आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, अंगणवाडी सेविका रंजना सावंत, अंजली राणे, नूतन निगुडकर, मदतनीस लक्ष्मी पोखरे, विजयालक्ष्मी शिरसाट, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर सुचीता मयेकर, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी सुहासिनी रेडकर, तसेच महिला ममता गावडे, सायली गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव नाईक, आरोग्य सेवक नीलकंठ बांदवलकर, बाबाजी गावडे, माजी प्राध्यापक जगन्नाथ पंडित, ग्रामपंचायत कर्मचारी लहू जाधव आदींचा निगुडे गावचे सरपंच समीर गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी तर आभार आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर यांनी मानले.
निगुडेत जागतिक महिला दिन साजरा…
