समाज कल्याण अधिकारी विनायक ठाकूर:लाभ घेण्याचे केले आवाहन
ओरोस ता १३
“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी “हे अभियान प्रत्येक जिल्हयात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांगानी आपल्या अडचणी आणि मागणी याबाबत लेखी पत्र गटविकास अधिकारी यांच्याकडे त्या त्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी १८ ऑक्टोबर पूर्वी द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे.
या अभियानात घ्यावयाच्या विविध बाबीच्या संदर्भात धोरण व अंमलबजावणी- करण्या करीता विधानसभा सदस्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे हे अभियान जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येणार असून यासाठी जिल्हास्तरीय समितीची रचना देखील स्पष्ट करण्यात आलेली आहे.
या अभियानाची जिल्हा स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी होणेसाठी सर्वसाधारण प्रमाणित कार्यपद्धती देण्यात आलेली आहे. यामध्ये अभियानाची पूर्वतयारी, विभाग प्रमुख कर्तव्य व जबाबदाऱ्या, कार्यक्रमाचे स्वरुप, अभियाना नंतरची कार्यवाही, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच प्रपत्र “अ” मध्ये प्रस्तावित स्टॉलची यादी व प्रपत्र “ब” मध्ये जिल्हयात अभियान राबण्याचा दिनांक नमूद केलेला आहे.
दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी हे अभियान प्रत्येक जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनच अशा दिव्यांग बांधवांच्या दारी गेले तर खऱ्या अर्थाने दिव्यांगाची सेवा होऊ शकते. या अभियानात जिल्हा स्तरावर शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकिय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करणार आहेत. यासाठी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी ” हे अभियान राबविण्यात येत आहे.
सर्व दिव्यांग बांधवांनी त्यांना आवश्यक बाबींची मागणी त्वरीत संबंधित विभागाकडे करून त्याची प्रत संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांजकडे दयावी. जणेकरुन त्याचा पाठपुरावा करुन संबंधित विभागाकडून १८ ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात देण्याबाबत नियोजन करता येईल. तरी जिल्हयातील सर्व अपंग बांधवांनी या अभियानाचा लाभ करून घेण्याचे अहवान जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी विनायक ठाकूर यांचे तर्फे करण्यात आले आहे.
