मित्र बनून संवाद साधल्यास अनेक समस्या दुर होवू शकतात

सौ. श्रध्दादेवी भोसले:पालकांनी आपल्या पाल्यांबाबत क्षमतांचा विचार करूनच आवडणाऱ्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे…

⚡बांदा ता.११-: आधुनिक तंत्रज्ञानाने सगळ्याच घटकांना व्यापलेल आहे. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील मुलांच्या अनेक समस्या या मोबाईलमुळे निर्माण झालेल्या आहेत. याचे गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आणि शरिरिक आरोग्यावर होत असून मोबाईलचा दुरुपयोग केल्यामुळे अनेक सामाजिक समस्या, सायबर क्राईम अशा घटनाना अनेक पालकांना सामोर जाव लागत आहे. यासाठी मुलांचे भावविश्व समजावून घेऊन त्यांचे मित्र बनून संवाद साधल्यास अनेक समस्या दुर होवू शकतात असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी सौ. श्रध्दादेवी भोसले यांनी येथे केले.

बांदा येथील खेमराज हायस्कुल व गीतरामायण फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत आयोजित केलेल्या पालक प्रबोधन परिषदेला संबोधित करताना सौ. भोसले बोलत होत्या. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि गीतरामायण फाऊंडेशन सिंधुदुर्गचे कार्यवाह ऍड. नकुल पार्सेकर यांनी उपस्थित पालकांना संबोधीत करताना आपण तीस वर्षाहून जास्त काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्हाभरातून अनेक पालक आपल्या मुलांच्या समस्या घेऊन आपल्याकडे येतात. पालक आपल्या मुलांच्या बाबतीत एवढे त्रस्त आहेत की पालक आणि बालक यांच्या मधला संवादच संपुष्टात आलेला असल्याने एका समस्येतून अनेक समस्या निर्माण होत आहेत, अशावेळी पालकांनी संयमाने आणि आपल्या पाल्यांबाबत अती महत्त्वकांक्षा न बाळगता त्यांच्या क्षमतांचा विचार करूनच त्याना आवडणाऱ्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे. असे आवाहन केले.

समुपदेशक सौ. नमिता परब यांनी वयात येणाऱ्या मुलींना त्यांच्या आईनेच मनात कोणत्याही प्रकारचा किंतु न बाळगता लैंगिक शिक्षण देण्याची नितांत गरज असून ठराविक वयात नैसर्गिकरित्या मुला-मुलीना शारीरिक आकर्षण असते अशावेळी पालकांनी सजगपणे मुलांच्या जास्तीत जास्त सहवासात राहून त्यांच्याशी प्रेमाने वागून योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी सावंत यांनी ग्रामीण भागातील मुलांना अशा मार्गदर्शनाची व समुपदेशनाची गरज असून भविष्यात असे उपक्रम सातत्याने आपण राबवणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला गीतरामायण फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा सौ. मंदा परब, खजिनदार प्रकाश दळवी, समुपदेशक सौ. अर्पिता वाटवे, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, पर्यवेक्षक नंदकिशोर नाईक तसेच सुमारे दोनशेहून जास्त पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका सौ. रश्मी नाईक यांनी केले तर आभार सौ. नेहा दळवी यांनी मानले.

You cannot copy content of this page