⚡मालवण ता.०९-: मालवण शहर व तालुक्यातील दलित वस्ती सुविधा व शासकीय योजना राबविण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या उदासिनतेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची भेट घेऊन लक्ष वेधले. याबाबत डॉ. मुणगेकर यांनी ज्या दलित वस्ती भागात समस्या आहेत तेथे बैठका घ्याव्यात, आपण तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे सांगितले. त्यानुसार मालवणात दलित वस्ती सुधारणा करण्याबाबत लवकरच बैठकांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती गणेश पाडगावकर यांनी दिली आहे.
मालवण शहर व तालुक्यातील दलित वस्ती असलेल्या भागात शासनाकडून अपुऱ्या सुविधा देण्यात येत असून सदर वस्त्यांमध्ये शासकीय योजना राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही बाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येत असल्याचे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या निदर्शनास आणून देत काही मुद्दे मांडले. यावर डॉ. मुणगेकर यांनी ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी बैठका घेऊन घ्यावात तसेच नगरपालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करावा, आपण त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे सांगितले. तसेच गावागावात तळागाळात जाऊन तिथल्या समस्यांवर काम करा, युवकांच्या हाती या देशाचे भविष्य आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील जनतेत जाऊन देशात जागोजागी युवा नेतृत्व निर्माण करत आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही काम करत रहा, मी तुमच्या सोबत आहे, असे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितल्याची माहिती गणेश पाडगावकर यांनी दिली आहे.
खास. डॉ. मुणगेकर यांच्या भेटीवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, विजय प्रभू, सरचिटणीस निलेश जोशी, अरविंद मोंडकर, सचिव बाब्या म्हापसेकर, विभावरी सुखी, अमिदी मेस्त्री व इतर पदाधिकारी उपस्थित होते.