⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला नगरपरिषदतर्फे नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने कालेलकारांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यास आणि त्यांचे स्नेही रविप्रकाश कुलकर्णी हे ‘कालेलकर-लेखक आणि माणूस‘ या व्याख्यानातून कालेलकरांच्या आठवणी जागवणार आहेत.
हा कार्यक्रम रविवार दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात विनामूल्य ठेवण्यात आला आहे. रविप्रकाश कुलकर्णी यांची ओळख ही उत्तम वाचक म्हणून आहे. गेली ५० वर्षे ते वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यातून नियमितपणे लेखन करीत आहेत. त्यांच्या या निर्लेप साहित्यसेवेबद्दल त्यांच्या एकाहत्तरीच्या निमित्ताने त्यांचा पुणे येथे गौरव करण्यात आला. ‘संपादन-प्रकाश‘ हा गौरव ग्रंथही प्रकाशित करण्यात आला. यात एक विभाग ‘संपादन‘ या विषयासंदर्भात असून दुस-या विभागात श्री. कुलकर्णी यांच्या स्नेह्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्तव वेंगुर्ल्यात जन्मलेल्या मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ व प्रशासक प्रशांत पानवेकर यांनी केले आहे.