⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील दुराव्यवस्था व विविध समस्यांबाबत वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे ८ सप्टेंबर रोजी रुगणालयाच्या ठिकाणी आंदोलन केले. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी डॉ. संदिप सावंत हे उपजिल्हा रुग्णालयास कायमस्वरूपी अधिक्षक म्हणून दिले आहेत. डॉ.सावंत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून येत्या ३० दिवसांत केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले.
शासकीय नियमानुसार मंजूर वैद्यकीय अधिकारी पदे उपलब्ध करून द्यावीत, डॉक्टर, इंचार्ज सिस्टर-२ आणि सफाई कर्मचारी यांचे एप्रिलपासून पगार नाहीत, गेल्या एक महिन्यापासून कनिष्ठ लिपिक आठवड्यातून एखादा हजर राहतात, त्यामुळे निधी खर्च करणे, विवाह नोंदणी करणे ऑफिससची कामे होत नाहीत. नवीन लिपिक मिळावा, औषधनिर्माण अधिकारी वेळेवर ड्युटीवर हजर राहत नाहीत, त्यामुळे रुग्णांना थांबून राहवे लागते. रुग्णालयातील लाईट गेल्यानंतर जनरेटर सुरू करा म्हणून सांगितले तर डिझेल नाही. जनरेटर असून डिझेल उपलब्ध नाही. प्रयोगशाळेत मशिनरी व प्रयोगशाळेत तंत्रज्ञ असून रिएजंट उपलब्ध नाहीत, त्यामुळे रुग्णांना २ दिवस रिपोर्टसाठी थांबावे लागते. पी.एम. रूम मोडकळीस आल्याने पी.एम. करणा-या कर्मचा-यांना धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. रूग्णवाहिकेच्या शेडवरील पत्रे तुटल्याने धोका निर्माण झाला आहे. रूग्णवाहिकेला ड्रायव्हर नाही. रूग्णालयाची सोलार सिस्टीम नवीन असून सुरू केलेली नाही. रुग्णालयाच्या आवारात जीर्ण झालेल्या वृक्षामुळे केबीन पी. एम. रूम यांना धोका आहे. रुग्णालयाच्या रस्त्याच्या पलिकडे विहीर असून पंपशेड मोडलेली आहे. ती नवीन बांधून त्याचे पाणी रुग्णालयाच्या वापरासाठी देण्यात यावे. सर्व शिपमध्ये सुरक्षारक्षक मिळावेत, एक्सरे टेक्नीशियन उपलब्ध नाही. रूग्णालयाच्या डॉक्टर निवासात कोण रहात आहे. यासह १७ मुद्दे यावर शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेविका सुमन निकम, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, महिला आघाडी संघटक मंजुषा आरोलकर, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संदिप सावंत यांचेशी चर्चा केली. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली-माने पवार, अधिरीचारीका डिसोजा तसेच शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तुषार सापळे, उपतालुका प्रमुख संजय गावडे, अॅड.जी.जी.टांककर, अल्पसंख्याक सेलचे तालुका प्रमुख रफिक बेग, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, सुजित चमणकर, गजाननन गोलतकर, दिलीप राणे, हेमंत मलबारी, दया खर्डे आदी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयाचा डॉक्टर निवास हा रिकामी आहे तेथे कोणी रहात नाहीत. रक्ताचे रिपोर्ट हे त्याचदिवशी मिळतील. रूग्णालयासाठी असलेल्या टेक्नीकल मशिनरीसाठी तंत्रज्ञ देण्यात येईल. १०२ रुग्णवाहिकेसाठी चालक मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे मागणी तसेच सफाई कामगार मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.संदिप सावंत यांनी स्पष्ट केले.
या जिल्ह्यातील दोन सुपुत्र हे शासनात केबिनेट मंत्री असताना सर्वसामान्य जनतेस उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळू शकत नाही. हे दुर्दैव आहे. जनतेतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे मत तालुका प्रमुख यशवंत परब यांनी स्पष्ट केले.