युवराज लखमराजे भोसले;सिनेट सदस्य पदी निवड झाल्याबद्दल स. का. पाटील शिक्षण मंडळाकडून सत्कार..
⚡मालवण ता.०७-: आपण जरी युवराज असलो तरी कोणतेही छोटे मोठे काम करण्यासाठी कधीही कमीपणा मानला नाही. येणाऱ्या काळात शिक्षणासह इतर क्षेत्रात कोणकोणते बदल होतील यासाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावे. विद्यार्थ्यांनी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे खेमसावंत भोसले यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात बोलताना केले.
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे खेमसावंत भोसले यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, संस्था सचिव चंद्रशेखर कुशे, विजय केनवडेकर, डॉ. शशिकांत झाट्ये, नंदू देसाई, प्रमोद ओरसकर, सुधीर धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लखमराजे भोसले यांनी शैक्षणिक धोरण २०२० विषयी मार्गदर्शन केले. बाळासाहेब पंतवालावलकर यांनी सावंतवाडी शिक्षण संस्था व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ यांच्यात पूर्वीपासून असलेले ऋणानुबंध आपल्या भाषणातून समोर आणत कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या शतकपूर्तीचा विशेषांक लखमराजे यांना भेट दिला. यावेळी डॉ. शशिकांत झाट्ये यांनीही शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन जिमखाना विभाग प्रमुख प्रा. एच. एम. चौगले यांनी केले तर आभार सचिव चंद्रशेखर कुशे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन जिमखाना विभाग व मराठी विभागाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमास आजी- माजी विद्यार्थी, प्राध्यापक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
