⚡मालवण ता.०५-: मालवण शहरात सुरु असलेला कमी दरातील सायकल व टीव्ही विक्रीचा उपक्रम बंद करावा, या मागणीसाठी मालवण शहरातील सर्व सायकल विक्रेते, टीव्ही, मोबाईल विक्रेते तसेच व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी नितीन वाळके व इलेक्ट्रॉनिक्स डिलर असोसिएशन सिंधुदुर्गचे प्रतिनिधी हेमचंद्र कोयंडे यांनी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांना निवेदन सादर केले.
याबाबत निलेश राणे यांनी स्थानिक व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही मागणी त्वरित मान्य करून हा विक्री उपक्रम बंद करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्याने हा उपक्रम बंद करण्यात आला.
निलेश राणे हे मालवण दौऱ्यावर आले असताना नीलरत्न बंगल्यावर मालवणातील व्यापारी वर्गाने भेट घेऊन कमी दरातील टीव्ही व सायकल विक्री उपक्रम संदर्भात निवेदन सादर केले. यावेळी मोबाईल विक्रेते संघटनेचे सत्यम पाटील, प्रशांत गावकर, सायकल व्यापारी संघटनेचे अनिल तेरसे व प्रसाद परुळेकर व इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी अशोक परब व मालवण व्यापारी संघटना शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटे, नाना साहील, हर्षल बांदेकर, सरदार ताजर आदी उपस्थित होते.
मालवण शहरात गेले काही दिवस सायकल व टीव्ही माफक दरात विक्रीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी खरेदी केल्याचेही समोर आले होते. या सेलमुळे शहरातील व्यापारी वर्गालाही स्पर्धेला सामोरे जावे लागून व्यापाऱ्यांनी स्पर्धात्मक किंमती करून आपापल्या व्यवसायातही विक्री सुरू केली होती. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातीलही नागरिकांना माफत दरात टीव्ही, सायकल उपलब्ध होत होती. त्यामुळे व्यापारी वर्गाने याकडे नीलेश राणे यांचे लक्ष वेधले.
याबाबत निलेश राणे यांनी स्थानिक व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही मागणी त्वरित मान्य करून हा सेल बंद करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. राणे यांच्या सूचनेनंतर शहरातील टीव्ही व सायकल विक्री करण्याचा उपक्रम तात्काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी शिष्टमंडळाकडून राणे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी दत्ता सामंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार लुडबे, महेश सारंग, विजय केनवडेकर आदी उपस्थित होते.
