हरी खोबरेकर:सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळेच हा लाठीचार्ज करण्यात आल्याचा केला आरोप…
मालवण (प्रतिनिधी)
जालना येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये वृद्ध महिलांसह अन्य आंदोलनकर्ते जखमी झाले. पोलिसांकडून झालेल्या या अमानुष लाठीचार्जचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून जाहीर निषेध केला आहे.
जालना येथे मराठा समाजाच्या वतीने शांततेच्या माध्यमातून आंदोलन सुरु असताना काल सायंकाळी आंदोलक व पोलीस यांच्यात धुमश्चक्री झाली. यात आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला. यात अनेक महिला, पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळेच हा लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यावरून एका बाजूला आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत असे सांगायचे आणि दुसरीकडे समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करायचा यावरून या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यामुळे सरकारच्या आणि पोलिसांच्या या कृतीचा ठाकरे गटाच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे हरी खोबरेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
