गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना ६ पर्यंत पोलीस कोठडी

ओरोस ता.०२-:

गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ओरोस जिजामाता चौक येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सात लाख ५३ हजार ९८० रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत गाडी चालक अभय नारायण केसरकर वय ४३ रा. बांदा काळसेवाडी आणि महादेव सुभाष नेवगी वय ३३ रा इन्सुली डोबवाडी यांना अटक केली होती. या दोघांनाही अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस डी चव्हाण यांनी ६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने १ सप्टेंबर रोजी पहाटे अवैध गुटख्याची बोलेरो गाडीतून वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर, यांनी ओरोस जिजामाता चौक येथे सापळा रचत बोलेरो गाडी क्रमांक एम एच ०७ ए जे २८३१ थांबवून सात लाख ५३ हजार ९८० रुपये किमतीचे गुरखा व सुगंधित तंबाखू जन्य पदार्थ जप्त केला होता. तसेच गाडी चालक संशयित आरोपी अभय केसरकर आणि महादेव नेवगी यांचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत तरतुदी नुसार कायद्याचा भंग केल्यामुळे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली होती. आज या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

You cannot copy content of this page