मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा

⚡मालवण ता.३०-: मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “मालवणच्या व्यापार उद्योगाला भरभराट दे… मासेमारी व्यवसायाला बरकत दे…”असे सागराला साकडे घालत मालवणवासीयांनी श्रीफळ अर्पण केले

मालवण मधील नारळी पौर्णिमेला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीपासून शिवकालीन परंपरा लाभली असून
व्यापारी आणि मच्छिमारांच्या दृष्टीने या नारळी पौर्णिमेला मोठे महत्व आहे. आज दुपारी मालवणच्या बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरातून व्यापारी संघाच्या वतीने मानाच्या श्रीफळाची मिरवणूक काढून श्रीफळ मालवण बंदर जेटीवर आणण्यात आला. याठिकाणी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्या हस्ते मानाच्या श्रीफळाचे पूजन करण्यात आले.

दरम्यान, शिवकालीन परंपरेनुसार सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिरात गाऱ्हाणे झाल्यानंतर सोनेरी मुलामा लावलेला नारळ ढोलताशे आणि नौबतीसह किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या किनारी आणून त्या श्रीफळाचे पुजन करण्यात आले आणि त्यानंतर हा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. या मानाचा नारळ सागराला अर्पण झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते सोनेरी मुलामा दिलेले मानाचे श्रीफळ सागराला अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपा नेते निलेश राणे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, रवी तळाशिलकर, नितीन वाळके, बाळू अंधारी, नितीन तायशेटये, नाना पारकर जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, शिवसेना ठाकरे गट तालुकांप्रमुख हरी खोबरेकर, मंदार ओरसकर, अमित भोगले, विजय केनवडेकर, जॉन नरोन्हा, परशुराम पाटकर, आप्पा लुडबे, राजू बिडये, यतीन खोत, ललित चव्हाण, महेश सारंग, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, महेश जावकर, अरविंद मोंडकर, गणेश प्रभुलीकर, हर्षल बांदेकर, विजय नेमळेकर, सौरभ ताम्हणकर, सहदेव बापार्डेकर, सत्यवान चव्हाण यांच्यासह अन्य व्यापारी प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मच्छिमार बांधवांच्या वतीनेही किनारपट्टीवरून सागराला श्रीफळ अर्पण करत नव्या मासेमारी हंगामात बरकत मिळो असे साकडे सागराला घालण्यात आले.

यावेळी मालवण व्यापारी संघाच्या मानाच्या नारळाचे व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे आमदार वैभव नाईक आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते देखील या नारळाचे पूजन करण्यात आले. यावेळी मालवणच्या भरभराटीसाठी सागराला गान्हाणे घालण्यात आले.
पर्यटन महासंघातर्फे रिक्षा रॅली

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण भरड ते बंदर जेटी अशी संस्कृती रॅली काढण्यात आली. यामध्ये दुसऱ्या वर्षी रिक्षांची रॅली काढण्यात आली. मालवण एसटी स्टॅन्ड ते भरड नाका, बाजारपेठ मार्गे बंदर जेटी अशी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने रिक्षा व्यावसायिक सजविलेल्या रिक्षा घेऊन सहभागी झाले होते. यावेळी रिक्षा व्यावसायिकांनी देखील आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मानाचा नारळ रिक्षा व्यवसायिक पप्या कद्रेकर यांच्या हस्ते समुद्राला अर्पण केला. या रॅली मध्ये पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर अविनाश सामंत, भाऊ सामंत, दादा वेंगुर्लेकर, शेखर गाड, मंगेश जावकर, मेघा सावंत, अन्वेशा आचरेकर, श्वेता सावंत, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, पंकज पेडणेकर, राजन परुळेकर, कैसर पठाण, श्री. पाटकर, मिलिंद झाड, आदीजण सहभागी झाले होते.

नारळ लढविणे व कबड्डीचा थरार

नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त मालवण बंदर जेटी परिसरात हौशी तरुण व बच्चे कंपनी नारळ लढविण्याच्या पारंपारिक खेळात दंग झाले होते. यावेळी नारळाच्या राशी खाली करत अनेकांनी नारळ लढविण्याचा आनंद लुटला. तर यावेळी समुद्र किनाऱ्याच्या वाळूत कबड्डी स्पर्धेचा थरारही रंगला.

You cannot copy content of this page