कोकणातील आंबा नुकसानीबाबत संयुक्त बैठक घेण्यात यावी…

एम. के. गावडे: राज्य
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन सादर..

⚡वेंगुर्ला ता.१८-: सध्याच्या हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे
कोकणातील हापूस आंबा
उत्पादक शेतकरी – बागायतदार पूर्णतः नुकसानीत आहे. याबाबत
सिंधुदुर्गात एकत्रित आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर शेतक-यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशी मागणी
राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव एम. के. गावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री
दत्तात्रय भरणे यांच्याकडे (12 फेब्रुवारी रोजी) लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, कोकणात गेली पाच – सहा वर्षे सातत्याने हापूस आंबा अपेक्षित पिक हातात येत नाही. बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, कमी – जास्त प्रमाणातील थंडी याचा परीणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी सन 2026 मध्ये उशिरापर्यंत पाऊस व लांबलेली थंडी यामुळे भरपूर मोहोर आला. शेतकरी सुखावून व कर्जमुक्त होईल या आशेने चार, पाच महागड्या औषधांचे स्प्रे घेतले आहेत. मात्र दुर्दैवाने फळधारणा झालीच नाही. बुरशीजन्य खार पडली व मोहर काळाकुट्‌ट झाला. कुठेतरी दहा टक्के फळधारणा झाली होती, तीही गळून पडली.त्यामुळे विक्रीसाठी सोडाच पण खाण्यासाठी आंबा शिल्लक राहीला नाही. लाखो रूपयांचे खत, औषधे मजूरी फुकट गेलेली आहे. अतिथंडीमुळे काजू पिकाचेही मोहोर करपल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. कधीही न डगमगणारा कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच हवालदिल झाला आहे. कोकणातला शेतकरी आत्महत्या कधीच करीत नाही. मुळात कमीत कमी कर्ज घेऊन त्याची वेळीच परतफेड करीत असतो. मात्र यावेळीची परिस्थिती पाहता कर्ज सोडाच पण त्याची मजुरीही वसूल होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना.
नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वस्तुस्थितीची मांडणी केलेली आहे. नुकसानीची संपूर्ण माहीती दिलेली आहे. मात्र आपल्या कृषी विभागाने वस्तूनिष्ठ परिस्थीतीचे अवलोकन करून अहवाल सादर करणे आवश्यक आहे. याबाबत आपण व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयाची नुकसानीची पाहणी करून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी, कृषीविभाग, फलोत्पादन विभाग व कोकण कृषी विदयापीठ यांची सिंधुदुर्गात संयुक्त आढावा बैठक घेऊन नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घ्यावी. एकत्रित सर्व विभागाचा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केल्याशिवाय योग्य नुकसान भरपाई मिळणे कठीण आहे. तरी लवकरात लवकर शेतक-यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सिंधुदुर्गतर्फे करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page