भाजपा कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचे आश्वासन..
⚡कुडाळ ता.३०-:
रॉयल फूड कंपनीला बॉयलर कोंबड्यांचा पुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या अनेक मागण्या कंपनीने मान्य केल्या असून प्रति किलो मागे १ रुपयाची दरवाढ करण्यासाठी भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्याशी कंपनीचे मालक मारियो यांनी सकारात्मक चर्चा केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी वेताळ बांबर्डे येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते निलेश राणे यांच्याशी पोल्ट्री व्यावसायिकांनी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या होत्या यावेळी भाजपने नेते निलेश राणे यांनी सांगितले होते की, लवकरच कंपनीच्या मालकांशी बोलून आपले प्रश्न मार्गी लावू.
दरम्यान आज (बुधवार) रॉयल फूड कंपनीला भाजपा नेते निलेश राणे यांनी भेट देऊन कंपनीचे मालक मारयो यांच्याजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या.
या कंपनीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक कोंबडी पुरवतात त्यांना यापुढे लागणारी पिल्ले तसेच चांगल्या दर्जाचे खाद्य वेळेवर पुरवठा करण्यात येईल असे कंपनीचे मालक मारिओ यांनी ग्वाही दिली. तसेच पोल्ट्री व्यावसायिकांना कंपनीकडून दिला जाणारा मोबदला हा वेळेत दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी दरवाढी संदर्भातही चर्चा केली. त्यामध्ये प्रति किलो १ रुपया वाढविण्यासंदर्भात कंपनीचे मालक मारयो यांनी सकारात्मकता दाखवली असून यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, पोल्ट्री व्यवसायिक दिनेश शिंदे, अमित तावडे आदी उपस्थित होते.
