सुपारीची चार पोती अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा…

पंधरा दिवसातील दुसरी घटना: शहरात घबराटीचे वातावरण

बांदा/प्रतिनिधी
    बांदा शहरातील बांदेश्वर मंदिर रस्त्यावरील सोसायटीच्या लगत असलेल्या गणेश रेसिडन्स मधील दुकान फोडून आतील ६१ हजार ६०० रुपये किमतीची सुपारीची चार पोती अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा केला. याप्रकरणी बांदा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदा शहरात गेल्या पंधरा दिवसात चोरीची दुसरी घटना घडल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  ही घटना मध्यरात्री २ नंतर घडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गजबजलेल्या ठिकाणी दोन्ही शटर तोडून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत दुकान मालक शामसुंदर रामकृष्ण नाटेकर यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, आज सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या दोन्ही बाजूकडील शटर उघडलेल्या स्थितीत आढळली. दोन्ही शटरची कुलपे तोडलेली होती. त्यांनी आतमध्ये पहिले असता प्रत्येकी ४० किलोची ४ सुपारीची पोती चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याची बाजारभावाने किंमत ६१ हजार ६०० रुपये असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
   सायंकाळी श्वास व ठसे तज्ज्ञचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र श्वान लगतच घुटमळले. त्यामुळे चोरट्याचा नेमका माग लागू शकला नाही. बांदा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुनील पडवळ करत आहेत.
फोटो :-
बांदा येथे दाखल झालेले श्वान पथक. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page