अन्यथा जन आंदोलन छेडू:काँग्रेसच्या आप्पा चव्हाण यांचा इशारा..
मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहर विकास आराखडा मंजूर झाला आहे. परंतु मालवण नगरपालिकेकडे त्याची नोंद नसल्याचे उत्तर नगरपालिकेकडून राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाला मिळाले. नगरपालिकेचे हे उत्तर म्हणजे विकास आराखड्याला हरकती दाखल करणाऱ्या नागरिकांची फसवणूक आहे. निवडणुकीपूर्वी हा आराखडा जनतेच्या मागणीनुसार तो प्रत्यक्ष आप्पा जागेवर जाऊनच मंजूर केला जावा, या मागणीसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडावे लागेल. त्यासाठी आपण व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खंबीरपणे अग्रभागी राहू असा इशारा वायरी येथील उद्योजक व राष्ट्रीय कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद उर्फ आप्पा चव्हाण यांनी दिला आहे.
मालवण नगरपालिकेकडून १५ नोव्हेंबर २०१५ रोजी या अन्यायकारक शहर विकास आराखड्यासंदर्भात लेखी व तोंडी हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. तत्कालीन सत्ताधारी व विरोधक यांच्यात नोव्हेंबर २०१६ च्या पालिका निवडणुकीत हा मुद्दा पुढे करून जनतेला वेठिस धरण्यात
आले होते. त्यानंतर गेल्या सात- आठ वर्षांत राज्यासह पालिकेत विविध पक्षांच्या आघाड्यांची सरकारे येऊन गेली. परंतु जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर निवडणुकांवेळी जाहिरनाम्याद्वारे मते मागून, आतापर्यंत अनभिज्ञ ठेवणाऱ्या त्या तत्कालीन लोकप्रतिनिधी व हरकती मागविणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीपूर्वी या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी पुन्हा चव्हाण रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. कारण गेल्या आठ वर्षांत पालिकेला या विषयावर हरकती मागवून त्या हरकतींचे निरसन करून अन्यायग्रस्त शहरवासियांना न्याय देता येत नाही हे दुर्दैवी आहे. शासनाने विलंब लावून जनतेला विनाकारण मनःस्ताप देत बेठिस धरणेही योग्य नाही. शहर विकास आराखड्यासंदर्भात १३०० पेक्षा जास्त हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यातील किती हरकतदारांना न्याय मिळाला की नाही, हे समजणे महत्वाचे आहे. हरकती नोंदवून घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे, असे आप्पा चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे
