⚡वेंगुर्ला ता.२४-: राज्य शासनाच्या रुग्णवाहिकेवर गेल्या नऊ वर्षांपासून काम करत असतानाही पगारवाढ करण्यात येत नसल्याने १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व वाहनचालक बेमुदत संप पुकारणार आहेत. यात वेंगुर्ला येथीलही वाहनचालक संपावर जाणार आहेत.
महाराष्ट्रात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ ही २०१४ पासून सुरू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका चालवणारे चालक हे अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र या विषयावर अद्यापदेखील तोडगा न निघाल्याने महाराष्ट्रातील रुग्णवाहिकेवर काम करणा-या चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान, वेंगुर्ला येथील शासनाच्या रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले वाहनचालकही संपावर जाणार आहेत.
