तहसीलदार अमोल पाठक:श्रावणमेळा २०२३ सोहळा उत्साहात..
⚡कुडाळ ता.२४-: भविष्यातील आरोग्याचे धोके टाळायचे असतील तर आपल्याला निसर्गातील रानभाज्याकडे वळले पाहिजे. नवीन तरुण पिढीला रानभाज्या खायला घातल्या पाहिजेत. रानभाज्याचे महत्व सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी आज श्रावणमेळा २०२३ सोहळ्यात केले. या मेळ्यामध्ये सुमारे ७०९ हून अधिक रानभाज्या मांडण्यात आल्या. तसेच विविध कार्यक्रमांनी हा सोहळा उत्तरोत्तर रंगतदार ठरला.
पंचायत समिती कुडाळच्या वतीने यावर्षी “मेरी मिट्टी मेरा देश” या समर्पित भावनेतून “मातृभुमी को नमन वीरों को वंदन” करणारा श्रावणमेळा कार्यक्रम आज येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात रानभाज्या प्रदर्शनासह पाककलाकृतीमध्ये ७०० हून अधिक प्रकार मांडण्यात आल्या. या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वृणाल मुल्ला, स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी माजी उपसभापती जयभारत पालव, सरपंच संघटना कुडाळ तालुका अध्यक्ष राजन परब, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, परिवेक्षनिय सहायक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, कृषी अधिकारी बाळकृष्ण परब, प्रफुल्ल वालावलकर, बालविकास प्रकल्पाच्या गीता चेंदवणकर, समूहनृत्य स्पर्धेचे परीक्षक भूषण तेजम, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, सागर दळवी, समूहगान परीक्षक प्रफुल्ल रेवणकर, मान्यता कुंटे, गौरव पिंगुळकर, रानभाज्याचे परीक्षक कल्पना खानोलकर, प्रसन्ना कोदे, राजा शृंगारे, डॉ. चारुलता आचार्य, शुभदा सावंत तसेच जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी वर्ग, कुडाळ तालुक्यातील समूहगान व समूहनृत्यातील शालेय विद्यार्थी, शिक्षक, कुडाळ तालुक्यातील सरपंच, आजी-माजी लोकप्रतिनिधीं आदी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार पाठक म्हणाले की, आपल्या आहारातील आजची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. आपल्याला आजार टाळायचे असतील तर निसर्गातील विविध रानभाज्याकडे वळले पाहिजे. आजच्या तरुण पिढीला या रानभाज्याचे महत्व सांगितले पाहिजे.
