मळगाव येथील प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात ८ रोजी महिला दिनाचे आयोजन….

सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या हस्ते मळगाव येथील महिलांचा होणार सन्मान_*

*💫सावंतवाडी दि.०५-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरमध्ये ८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता महिला दिनाचे आयोजन कोविड नियमावलीचे पालन करून करण्यात आले आहे. यावेळी मळगाव येथील महिलांचा सन्मान सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती यादव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मळगाव पडवळवाडी येथील प्रसिध्द वैद्य कै. मनोहर तथा अण्णा पडवळ यांच्या कन्या श्रीमती सुरेखा मनोहर पडवळ या गेली २५-३० वर्षे आपल्या वडिलांच्या पश्चात कावीळ, मुत्रखडा, गोवर, कांजिण्या, नागीण आदी आजारांवर वनौषधीपासून तयार केलेली गुणकारक औषधे सेवाभावी वृत्तीने देत आहेत. त्यांच्या या निरपेक्ष सेवेबद्दल त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मळगावच्या सुकन्या व स्नुषा श्रीमती ललीन प्रभाकर तेली यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. श्रीमती ललीन प्रभाकर तेली या सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका असून गेले एक तप कीर्तन व निरुपण करून एक वेगळच व्यक्तिमत्त्व विकसित केले आहे. त्यांनी सुध्दा आपले वडील तथा मळगावचे त्या काळातील प्रसिध्द कीर्तनकार कै. तुकाराम गोसावी बुवा यांच्याकडून वारसा घेतला आहे. त्या कीर्तन अलंकार विभूषित असून आजपर्यंत त्यांनी पाचशेपेक्षा जास्त कीर्तने केली आहेत. अशा या गावच्या दोन्ही सुकन्यांचा सन्मान शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रोख रक्कमेसह जागतिक महिला दिनी वाचनालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती यादव यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या प्रायोजक श्रीमती उज्ज्वला खानविलकर-पटेकर आणि मळगावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती स्नेहल जामदार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कोविड -१ ९ संदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या सर्व अटी नियम व सूचना यांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page