ज्यांची भाजप मध्ये पदानवती झाली त्यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका करू नये

मी एकटाच पुरून उरेन; हरी खोबरेकर यांचा विजय केनवडेकर यांना इशारा

मालवण (प्रतिनिधी)

पूर्वी भाजपचे तालुकाध्यक्ष असणारे विजय केनवडेकर आता शहरप्रभारी झाल्याने त्यांची एकप्रकारे अधोगती झाली आहे. त्यामुळे आम. वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापूर्वी केनवडेकर यांनी स्वतःचा प्रवास तपासून पहावा. कारवाईच्या भीतीने भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांना लोकसभेत कसे बोलावे हे कळतं नाही, त्यामुळे केनवडेकर यांनी राणे यांच्याशी आम. नाईक यांची तुलना करू नये. आम. नाईक हे लढवय्ये असल्यानेच जनतेने त्यांना विधानसभेत पाठवले आहे. आमदारांबद्दल अफ़वा पसरवून बदनामी करण्याचे षडयंत्र करू नये. मला प्रतिआव्हान देणाऱ्या विजय केनवडेकर यांनीच तारीख, वेळ आणि ठिकाण सांगावे, हा हरी खोबरेकर एकटाच तुम्हाला पुरून उरेल, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणजे काय ते मी दाखवून देईन, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

मालवणात शिवसेना ठाकरे गट व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असून राणे बंधूनी आपल्या वाचाळ जिभेला लगाम घालावा अन्यथा शिवसैनिक बंदोबस्त करतील असा इशारा दिल्यानंतर भाजप तर्फे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी हरी खोबरेकर यांच्या आव्हानास तयार असल्याचे सांगत वेळ ठिकाण सांगावे असे प्रत्युत्तर दिले होते. यावर आज हरी खोबरेकर यांनी शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेत भाजप पदाधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, महेश जावकर, मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, दिपा शिंदे गौरव वेर्लेकर नरेश हुले, दादा पाटकर, जयदेव लोणे, शिल्पा खोत, नीनाक्षी शिंदे, मोहन मराळ, नंदा सारंग, शांती तोंडवळकर, बाबु वाघ, ज्योती तोंडणकर, तन्वी भगत, साक्षी मयेकर, दीपा पवार, दिया पवार आदी उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, भाजपने आत्मविश्वास दाखवून नारायण राणे यांना विधान परिषद आमदार, राज्यसभा खासदारकी दिली. आता केंद्रीय मंत्रिपद दिल्यावर माजी मुख्यमंत्री असणारे राणे आपल्या कामगिरीचा ठसा उमटवतील अशी आशा भाजपला होती. मात्र भाजपच्या आत्मविश्वासाला अविश्वास देण्याचे काम राणेनी केले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.केंद्रीय मंत्री म्हणून संसदेत काय बोलावे, कोणते उच्चार करावे व करू नये हे नारायण राणेना कळले नाही, आणि आशा व्यक्तीला भाजपने मंत्री बनवले आहे, त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या हिंदी बोलण्यावरून टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी आता नारायण राणे यांना हिंदी जोडाक्षरे शिकवावीत, अशी टीका हरी खोबरेकर यांनी केली.

काही लोकांना मदत द्यायची आणि त्याची प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी करायची असे काम भाजप व निलेश राणे यांच्याकडून सुरु आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही अशी प्रसिद्धी करण्यास शिवसैनिकांना शिकवले नाही. म्हणूनच आम. वैभव नाईक कोणताही गाजावाजा न करता सातत्याने लोकांना मदत करत असतात. खासदार विनायक राऊत व आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी या भागात आला आहे. पहिल्या दहा खासदारांच्या यादीत खास. राऊत यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे कोणत्या यादीत बसतात हे भाजप पदाधिकाऱ्यांनी बघावे. बॉण्ड पेपर वर लिहून देऊन मदत देण्याचे ढोंग भाजप कडून सुरु आहे. निलेश राणे यांनी आपतकाळातही तुटपुंजी मदत देऊन त्याची जाहिरात बाजी करण्याचे काम भाजप करत आहे. मात्र आम. वैभव नाईक यांनी आपतग्रस्ताना मदत मिळवून देत नुकसानी बाबत विधानासभेतही प्रश्न मांडला. त्यामुळे खासदार राऊत व आम. नाईक यांच्याशी कोणाची तुलना करण्याचा प्रयत्न भाजप पदाधिकाऱ्यांनी करू नये, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

मालवण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेवर कर्ज काढण्याची वेळ आल्यावर आम. नाईक यांच्या प्रयत्नातून ८ कोटींचा निधी मिळाला. हे काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. मात्र हे काम ठेकेदाराच्या चुकीमुळे रखडले असेल त्याची चौकशी झाली पाहिजे. भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये, असे पत्र आम्हीही दिले होते. हे काम पूर्ण होऊन जनतेसाठीच हा निधी खर्च झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी आणण्यात आम्ही यशस्वी झालो, त्यामुळे ठाकरे गटाने काय केले असे विचारून टिकाटिप्पणी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपने काय केले हे सांगावे, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

You cannot copy content of this page