सावंतवाडी वन कार्यालयावर आज मोर्चा; हत्ती हटाव मोहीम राबवण्याची मागणी
⚡दोडामार्ग ता.१०-:तिलारी खोऱ्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.शेती बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींना त्यांच्या मूळ अधिवासात पाठवा या मागणीसाठी खोऱ्यातील शेतकरी आज सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहेत.
तिलारी खोऱ्यातील केर,मोर्ले, पाळये,सोनावल,तेरवण मेढे,हेवाळे,घाटीवडे, बांबर्डे आदी गावातील शेतकरी हत्तींच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा हत्ती हटाव मोहीम राबवून हत्तींना मूळ अधिवासात पाठवण्याची ते मागणी करत आहेत.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी काही दिवसांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन हत्ती हटाव मोहीम राबविण्याची मागणी केली होती.त्यावर सरकार काय निर्णय घेते ते पाहावे लागेल.
‘हत्ती हटाव’चा निर्णय केंद्राचा
दोडामार्ग तालुक्यातील हत्तींना कर्नाटकातील त्यांच्या मूळ अधिवासात पाठवायचे झाल्यास ती मोहीम राबवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते.महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्ये केंद्रसरकारसाठी समान असल्याने झटकन परवानगी मिळण्याची शक्यता धूसर आहे.शिवाय तिलारी परिसर सरकारच्या दृष्टीने अघोषित अभयारण्य असल्याने हत्ती हटाव मोहिमेसाठी स्थानिक शेतकरी लोकप्रतिनिधी यांना फार मेहनत घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
