बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी..
⚡कणकवली ता.१०-: ऑगस्ट २०२३ मध्ये पवित्र पोर्टल मधून होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत कोरोनामुळे ज्या डीएड, बीएड असलेल्या उमेदवारांचे आई, वडील किंवा पतीचे निधन झाले आहे व जे अलिकडील काळात वय वाढल्याने नोकरीसाठी अपात्र ठरणार आहेत अशा डीएड, बीएड उमेदवारांना टीईटी परीक्षा पास होण्याची अट न घालता निराधार या निकषाखाली तत्काळ शिक्षक म्हणून नियुक्ती देऊन भरती प्रक्रियेत संधी देण्यात यावी अशी मागणी बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनायक भानुकांत हरकुळकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या मागणीचा ना.दिपक केसरकर यांनी सकारात्मक विचार करून कोरोनामध्ये आई, वडील किंवा पती गमावलेल्या डीएड, बीएड उमेदवारांना शिक्षक भरतीत समाविष्ट करून त्यांना व त्यांच्या निराधार कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी केली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीत कोरोनामुळे आई, वडील किंवा पतीचे छत्र हरपलेल्या तसेच वय वाढल्याने शासकीय निकषानुसार अपात्र ठरत चाललेल्या अशा डीएड, बीएड उमेदवारांना संधी न मिळाल्यास ते सरकारी शिक्षक पदासाठी कायमचे मुकणार आहेत असेही या निवेदन पत्रात म्हटले आहे.
