शून्य ते ५ वयोगटातील बालकांना, गरोदर मातांचा शोध घेवून करणार लसीकरण:जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी ता ४
बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच गोवर रूबेला आजाराचे दूरीकरण करण्यासाठी ७ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात “विशेष मिशन इंद्रधनुष ५.०” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचा, गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील बालके व गरोदर मातांचे नियमित लसीकरण केले जाते. मात्र काही वेळा विविध कारणामुळे काही बालके व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे दिसून आले आहे. अशा बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यासाठी इद्रधनुष् ५.० राबविण्या मागचा उद्देश् आहे. अशाप्रकारे सद्यस्थितीत जिल्ह्यात ० ते २ वयोगटातील ७७ बालके, २ ते ५ वयोगटातील २८ बालके अशी एकूण १०५ बालके लसीकरणापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे तर १० गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहिल्याचे आढळून आले आहे. अशा एकूण ११५ लाभार्थ्यांची या मोहिमेत प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये ० ते २ वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच २ ते ५ वर्षे वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डी पी टी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल अशा लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा समावेश करण्यात येणार आहे.
“विशेष मिशन इंद्रधनुष ५.०” कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळा, ग्रामपंचायत अशा सोयीच्या ठिकाणी लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही लसीकरण पूर्ण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर मातांचा शोध घेऊन या लसीकरण मोहिमेमध्ये त्याना लसीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र विशेष मिशन इंद्रधनुष ५.० हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर उपस्थित होते.
