आमदार वैभव नाईक निष्क्रिय आणि ढोंगी लोकप्रतिनिधी…

नीलेश राणे यांची जोरदार टीका; ढोंगीपणा बंद करून मतदार संघातील कामांवर लक्ष द्या…

कुडाळ ता.०३-:आपला मतदारसंघ उघड्यावर टाकून दुसऱ्याच्या मतदारसंघात डोकावणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यासारखा ढोंगी आणि निष्क्रिय आमदार कोण नाही अशी टीका कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख व माजी खासदार निलेश राणे यांनी करून उपवडे गावातील कॉजवेला पडलेल्या भगदाडामध्ये ग्रामस्थांसोबत माजी खासदार निलेश राणे यांनी वृक्षारोपण केले.


उपवडे येथील धावलवाडी, दातरवाडी, फोफळीवाडी जोडणाऱ्या कॉजवेला भगदाड पडले या मार्गाने वाहतूक करणे या ठिकाणच्या ग्रामस्थांना कठीण होऊन बसले आहे. आमदार वैभव नाईक यांच्या निष्क्रियतेमुळे हे होत असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगून भगदाडामध्ये वृक्षारोपण केले. यावेळी तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, उपवडे उपसरपंच गवस, माजी सरपंच मनोहर दळवी, कांता कदम, आबा मोरोजकर, कृष्णा गवस, मोहन धुरी, एकनाथ मोजकर, विष्णु निचम, विशाल परब, संजू परब, मोहन सावंत, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, रुपेश कानडे, पप्प्या तवटे, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे आदी उपस्थित होते.
यावेळी कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी सांगितले की, या ठिकाणची ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आमदार, खासदार त्यांचे असे असताना या गावांमध्ये रस्ते, जोड रस्ते, साकव यांची वाताहत झाली आहे. इतरांच्या मतदार संघामध्ये जाऊन आमदार वैभव नाईक आंदोलने करीत आहेत. पण त्यांचाच अख्खा मतदार संघ खड्ड्यात गेला आहे. हे त्यांना दिसत नाही फक्त स्टंटबाजी करायची हे त्यांचे काम उरले आहे. त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांना पडलेली खड्ड्यांची चाळण कॉजव्यांना पडलेले भगदाडे हा त्यांचा आरसा दाखवण्यासाठी उपवडे येथे कॉजवेवर वृक्षारोपण करण्यात आले. ढोंगीपणा बंद करून मतदार संघातील कामांकडे लक्ष द्या तसेच झोपी गेला आहात तुम्हाला जाग आणण्यासाठी वृक्षारोपण केले आहे. मतदारसंघाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी न घेणारे ढोंगी आणि निष्क्रिय आमदार म्हणजे वैभव नाईक असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.

You cannot copy content of this page