४५ विधीज्ञ व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
कुडाळ : न्यायालयीन आणि कार्यालयीन कामकाजाच्या स्वरूपामुळे अनेकांना दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते. त्यामुळे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी तसेच स्नायू व सांध्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा शारीरिक तक्रारींवर मात करण्यासाठी आणि दीर्घकाळ शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी फिजिओथेरपी उपचारपद्धती उपयुक्त ठरते. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी आणि संबंधितांनी या उपचारपद्धतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ न्यायालयाचे न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. ए. कुलकर्णी यांनी केले.
बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय, तालुका विधी सेवा समिती कुडाळ आणि कुडाळ तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश, विधीज्ञ आणि कर्मचाऱ्यांसाठी फिजिओथेरपी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून कुलकर्णी बोलत होते. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रत्येकाने आपले आरोग्य चांगले राखावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कुडाळ न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश एन. ए. बकरे, कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष जी. टी. पडते, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल यांच्यासह महाविद्यालयातील डॉक्टर, विधीज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
सहदिवाणी न्यायाधीश एन. ए. बकरे यांनी न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप आणि बैठक व्यवस्थेचा विचार करता, व्याधीमुक्त जीवनासाठी फिजिओथेरपीविषयक मार्गदर्शन दैनंदिन जीवनात लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करून संस्थेला धन्यवाद दिले.
फिजिओथेरपी उपचारपद्धतीची माहिती देताना प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल यांनी सांगितले की, न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजात सलग अनेक तास बसून राहणे, संगणकाचा सतत वापर करणे, शरीराची चुकीची ठेवण आणि हालचालींचा अभाव यांमुळे विविध शारीरिक तक्रारी उद्भवू शकतात. या समस्या कमी करण्यासाठी आणि भविष्यातील व्याधी टाळण्यासाठी फिजिओथेरपी उपयुक्त ठरू शकते.
कामाच्या दरम्यान नियमित अंतराने विश्रांती घेणे, थोडे चालणे, योग्य बैठक पद्धतीचा अवलंब करणे, कामाच्या जागेची रचना शरीराला अनुकूल ठेवणे आणि दैनंदिन जीवनात नियमित व्यायामाचा समावेश करणे आवश्यक आहे. फिजिओथेरपी केवळ वेदना कमी करण्यापुरती मर्यादित नसून शरीराच्या हालचाली सुधारणे, स्नायूंची ताकद व लवचिकता वाढविणे आणि दैनंदिन कामकाज अधिक सहजपणे करता येण्यासाठीही उपयुक्त आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला न्यायालयातील विधीज्ञ आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ४५ विधीज्ञ व कर्मचाऱ्यांना फिजिओथेरपीविषयक मार्गदर्शन आणि उपचार देण्यात आले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत डॉ. बिस्वाल यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.
कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष जी. टी. पडते यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. विधीज्ञ व कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शिबिराचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एच. ए. कारेकर, कनिष्ठ लिपिक यांनी केले. शिबिराच्या व्यवस्थेसाठी एस. डब्ल्यू. पई, सहायक अधीक्षक (प्रशासन) आणि के. टी. कदम, वरिष्ठ लिपिक यांनी सहकार्य केले. न्यायालयातर्फे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाचे या उपक्रमाबद्दल आभार मानण्यात आले.
या उपक्रमामुळे न्यायालयीन अधिकारी, विधीज्ञ आणि कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

