थकीत वेतनासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच

मालवण स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगारांचा प्रश्न :

*💫मालवण दि.०३-:* मालवण नगरपालिकेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगार, कचरा वाहन चालक यांचे तीन ते चार महिन्यांचे वेतन ठेकेदारांनी थकीत ठेवल्याने २५ कंत्राटी कामगारांनी कालपासून छेडलेले बेमुदत कामबंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने या कंत्राटी कामगारांचे वेतन न देता अथवा त्यांच्याशी चर्चा न करता संबंधित ठेकेदार एजन्सीने बाहेरून नवीन पाच कामगार आणून कचरा उठाव करण्यास सुरुवात केल्याचा आरोप कंत्राटी कामगारांनी केला असून या प्रकाराने कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या कंत्राटी कामगारांनी जिल्ह्याच्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधत उद्या ४ मार्च पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्याच्या प्रति कोकण आयुक्तांसह मालवण नगरपालिका मुख्याधिकारी, मालवण नगराध्यक्ष, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, मालवण पोलीस निरीक्षक यांनाही सादर करण्यात आल्या आहेत. मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे गेल्या तीन चार महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक बनलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी काल बेमुदत काम बंद आंदोलन छेडले होते. हे आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरुच ठेवले होते. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता शहरात कचरा उचल करण्याचे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. स्वच्छतेचे काम करताना आवश्यक असणारे हॅन्ड ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझर व गणवेश आदी सुविधाही दिल्या जात नाहीत. त्यामुळे थकीत वेतन मिळवून देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कामगारांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे कामगार आक्रमक होऊन त्यांनी काम बंद आंदोलन छेडले. एकीकडे कंत्राटी कामगारांचे वेतन दिलेले नसताना संबंधित ठेकेदार एजन्सीने आज दुसरे पाच कामगार आणून मालवण शहरात कचरा उठाव करण्यास सुरुवात केल्याची माहिती या कामगारांना मिळताच त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली . जुन्या कामगारांचे पैसे दिले जात नसताना नवीन कामगार आणण्यात आल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे नवीन कामगारांना सुरक्षिततेच्या कोणत्याही गोष्टी पुरविण्यात आलेल्या नसताना नगरपालिका प्रशासन जाणिवपुर्वक ठेकेदाराला पाठिशी घालत आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान,सरकारी कामगार अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या या अन्यायाबाबत कामगारांनी जिल्हा सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. दि. १३ एप्रिल २०२० रोजी मालवण नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कचरा वाहतूक वाहन चालक तसेच स्वच्छता कामगार आणि झाडी कामगार यांनी नियमित न मिळणारे वेतन व संरक्षणात्मक साहित्य आदी विषयी समस्यांचे निवेदन सादर केले होते. मात्र त्या निवेदनाचे पुढे काय झाले हे जवळपास एक वर्ष उलटून गेले तरी अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले नाही. अथवा बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न जाणून घेतले नाही. त्यामुळे सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे डोळेझाक करुन ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याचा संशय कंत्राटी कामगारांनी निवेदनातून व्यक्त केला आहे. मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांनाही वेळोवेळी कळविले आहे. मात्र त्यांनी आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. जर अन्याया विरोधात आवाज उठविल्यास तुम्हांला कामावरुन काढून टाकू अशी धमकीही संबंधितांकडून दिली जात असल्याचे कामगारांनी निवेदनात म्हटले आहे. दोन ठेकेदारांकडे कचरा उचल करण्याचे काम करत असताना आम्हाला बऱ्याच समस्यांमधून जावे लागत आहे. वेतनाअभावी आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. आमच्या मुलांचे शिक्षण करणे कठीण झालेले आहे. पैशाअभावी घरात औषधपाणी नेणे शक्य होत नाही. लांबून प्रवास करुन येणाऱ्या कामगारांना प्रवासासाठी पैसे नसल्यामुळे कामावर येणे कठीण होत आहे. त्यामुळे काम बंद आंदोलन छेडले आहे. मात्र तरीही न्याय मिळत नसल्याने नाईलाजास्तव मालवण नगरपालिकेसमोर दि. ४ मार्च पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कंत्राटी कामगारांनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांना दिला आहे.

You cannot copy content of this page