⚡मालवण ता.०३-: सध्या पावसाळ्यात जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज खंडीत होण्याचे प्रकार दैनंदिन घडत आहेत. काही भागातील नागरिकांना अनेक दिवस वीजेविना काळोखात घालवावे लागत आहे. वीज ग्राहकांना वीजवितरण कंपनीच्या दर्जाहीन सेवेचा नाहक त्रास होत असताना विज दरात मात्र भरमसाठ वाढ केली जात आहे. अशा वीजेबाबत विविध समस्या सोडविण्या संदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता अनंत मुक्ताई हॉटेल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि एकमताने निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व आठही तालुक्यातील वीजे संदर्भातील समस्या समजून घेणे तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी तालुकानिहाय कार्यकारिणी गठीत करणे, ग्राहक मेळाव्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेणे, जिल्ह्यातील विविध भागातील वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करणे अशा विविध विषयांवर चर्चा करून ठोस भुमिका घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वीज समस्या सोडविणे व वीज ग्राहकांना न्याय देणे हा या संघटनेचा हेतू असल्याने वीजेबाबत तक्रार असलेले नागरिक, संघटनेचे पदाधिकारी तसेच विज ग्राहक संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारीणीत काम करु इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे अवाहन विज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व समन्वयक यांनी केले.
