⚡मालवण ता.०३-: महसूल सप्ताहानिमित्त मालवण तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला. तालुक्यात उत्कृष्ट सेवा बजावणारे नायब तहसीलदार, महसूल साहयक, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, शिपाई, कारकून आदींचा यावेळी परीक्षाधीन उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पुरवठा नायब तहसीलदार नागेश शिंदे आदी उपस्थित होते.
दि. ३ ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत ई-पीक पाहणी, ई-ऑफिस, ई-चावडी, ई-मोजणी प्रणालींच्या प्रभावी अंमलबजावणीकामी मंडळातील सर्व तलाठ्यांना सूचना करण्यात आल्या. आपत्ती व्यवस्थापन, गावठाण विस्तार, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजनांबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ४ रोजी जनसंवाद उपक्रमांतर्गत फेरफार अदालत घेऊन प्रलंबित फेरफार निर्णयित केले जाणार आहेत. मृत खातेदाराचा वारस तपास उपक्रम याचदिवशी राबविला जाणार आहे. मालवण तहसील कार्यालय आणि सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. ५ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक आदींच्या विविध दाखले प्रमाणपत्रासाठीच्या व प्राप्त अर्जावर कार्यवाही केली जाणार आहे. त्यांची महसूलविषयक कामे निर्गत करण्याकरिता मार्गदर्शन केले जाणार आहे. मालवण तहसील आणि सर्व तलाठी कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम होईल. ६ रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद कार्यक्रमांतर्गत त्यांची महसूलविषयक प्रलंबित कामे मालवण तहसील आणि सर्व तलाठी कार्यालयांमध्ये मार्गी लावली जाणार आहेत. ७ ऑगस्टला सांगता समारंभदिनी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देऊन सप्ताहानिमित्त केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे.
मालवण तहसील कार्यालयात महा ई-सेवा केंद्र आहे. तरीही मालवण व आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थ, विद्यार्थी विविध दाखले आणि प्रतिज्ञापत्रांसाठी दूरवरील येथील महा ई-सेवा केंद्रांमध्ये आपले प्रस्ताव सादर करतात. ग्रामस्थांनी आपल्या विभागातील जवळच्या महा ई- सेवा केंद्रांमध्येच प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.
