⚡मालवण ता.०२-: रोटरी क्लब ऑफ मालवण तर्फे
कुपोषित बालक वैद्यकीय तपासणी शिबिर आज बुधवारी कोळंब ग्रामपंचायत शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाले. या शिबिरात मालवण तालुक्यातील ११० मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उदघाटन रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिरात उपस्थित मुलांची तपासणी करून त्यांना प्रत्येकी २ बॉटल व्हिटॅमिन सिरप व पौष्टिक लाडू देण्यात आले. या व्हिटॅमिन सिरपच्या बॉटल रोटरी क्लबचे सदस्य रो. अमेय पारकर यांच्या तर्फे देण्यात आल्या होत्या. या शिबिरासाठी मालवण मधील डॉ. हरिश परुळेकर व डॉ. अमोल झांटये यांचे बहुमोल सहकार्य लाभले. स्तनपान सप्ताह सुरु असल्याने त्याच्या माहितीच्या पत्रकांचे वाटप यावेळी अंगणवाडी सेविकांना करण्यात आले.
या शिबिरात तपासणी केलेल्या सर्व ११० कुपोषित मुलांना पुढील वर्षभर रोटरी क्लब तर्फे प्रत्येक महिन्याला २ व्हिटॅमिन सिरपच्या बॉटल देण्यात येणार आहेत, जेणे करून तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे यावेळी रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम यांनी सांगितले.
या शिबिरास अध्यक्ष अभय कदम यांच्यासह रोटरीचे सदस्य डॉ. लीना लिमये, ऋषीकेश पेणकर, रमाकांत वाक्कर, अमेय पारकर, मनोज रावले तसेच मालवणचे गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, कृषि अधिकारी संजय गोसावी, कोळंब प्राथमिक आरोग्य केंद्रचे डॉ. पवार, एकात्मिक बालविकासच्या सौ. रसाळ, स्नेहल गावडे, मंगल जंगले, उल्का खोत आदी उपस्थित होते.
