तळाशील ग्रामस्थांची आजी माजी लोकप्रतिनिधींकडून फसवणूक – अमित इब्रामपुरकर

⚡मालवण ता.३०-: तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थांनी बांधाऱ्यांसाठी उपोषण केले होते, त्यावेळी आमदार वैभव नाईक तिथून पळून गेले होते. त्यावेळी आपत्कालीन निधीतून बंधारा बांधण्यात येईल तसेच किनारपट्टी व नदीकडील भागातून भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जातील असे आश्वासन आमदारांनी दिले होते, त्याचे पुढे काय झाले हे आमदारांनी स्पष्ट करावे. तर दुसरीकडे राणेपुत्रांनी तळाशील बंधाऱ्यासाठी १० दिवसांमध्ये १० कोटी आणणार अशी घोषणा केली, त्या १० कोटीचे पुढे काय झाले? ते त्यांनी सांगावे. हे दोन्हीही आजी माजी लोकप्रतिनिधी तळाशील ग्रामस्थांना फसवत आहेत, अशी टीका मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

ज्यावेळी तळाशील ग्रामस्थ जीव मुठीत धरून असतात त्यावेळी आमदार वैभव नाईक अशा प्रकारे आपत्कालीन निधीतून काम केले जाईल अशा प्रकारचे वक्तव्य करतात. इतर वेळी आमदार तेथे फिरकत देखील नाही. जेटी लाटांच्या तडाख्यात वाहून जाणार हे माहीत असताना होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना का केली नाही ? प्रत्येक वेळी आपत्कालीनचा निधी वापरणार काय ? आमदार फंड खासदार फंड का देऊ शकत नाही ? सभागृहात प्रश्न का उपस्थित करू शकत नाहीत? मागील काळात सरकार असताना निधी का आणू शकले नाहीत ? पतन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तळाशील तोंडवळी संबंधी बैठका का घेत नाहीत ? अशा प्रश्नांची सरबत्ती अमित इब्रामपुरकर यांनी केली आहे.

मागच्या वेळी आपत्कालीन निधीतून काम सुरू असताना त्या कामावर फिरणारे डंपर कोणाचे होते हे ग्रामस्थांना माहित आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा आपत्कालीन निधीतून काम सुरू असताना आपले डंपर फिरावेत यासाठी आमदार नाईक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत का ? असा खोचक सवालही इब्रामपूरकर यांनी उपस्थित केला आहे.

तळाशील तोंडवळी येथील ग्रामस्थांनी आम. वैभव नाईक यांना निवडून दिले आहे. दरवर्षी ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असतात. पावसाळ्यामध्ये होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आमदारांकडून उपाय योजना करणे आवश्यक होते, परंतु ते होताना दिसत नाही. आम. वैभव नाईक यांची ही शेवटची टर्म आहे. पुढच्या वर्षी निवडणुका आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल, असेही अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page