रोटरीच्या पौष्टिक आहार पाककला स्पर्धेत सौ. आरती वरक प्रथम

⚡मालवण ता.३०-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या यंदाच्या मिलेट वर्ष म्हणजेच भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी सॅफ्रॉन येथे आयोजित केलेल्या ‘पौष्टिक आहार पाककला’ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत सौ. आरती गणेश वरक (मिक्स मिलेट उतप्पा व भोपळा – गाजराची चटणी) या विजेत्या ठरल्या. तर द्वितीय क्रमांक सौ. प्रियांका स्वप्नील पाटणे (धपाटे व पडवळीच्या बीयांची चटणी) यांनी व तृतीय क्रमांक सौ. माधुरी संदीप सामंत (चवदार पौष्टिक भाजी व मिश्र पिठाचे थालीपीठ) यांनी मिळविला.

या स्पर्धेचे उदघाटन अन्नपूर्णेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारमाठचे उपसरपंच जीवन भोगावकर, रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम, रोटरीच्या डॉ. लीना लिमये, ऋषीकेश पेणकर, अनिल चव्हाण, अभय कवटकर, रमाकांत वाक्कर, विनय गांवकर, भाऊ साळगांवकर, मनोज रावले, सुविधा तिनईकर, तनिष्का कासवकर, अन्वेशा कदम, रश्मी वाक्कर, प्रणाली चव्हाण आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत वरी, बाजरी, ज्वारी, नाचणी यापासून बनविलेला पदार्थ तसेच आयोजकांनी निवडून दिलेल्या भाज्यांपासून पदार्थ बनवायचा होता. यात ३० महिला स्पर्धकांनी सहभाग घेत बनविलेले विविध पदार्थ सादर केले होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. गार्गी ओरसकर व रतन पांगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. लीना लिमये यांनी केले.

प्रथम विजेत्यास महादेव पाटकर पुरस्कृत रु. ११११, द्वितीय क्रमांकास ऍड. हेमेंद्र गोवेकर पुरस्कृत रु. ९९९, तृतीय क्रमांकास ऋषिकेश पेणकर पुरस्कृत रु.७७७ तसेच तिघांनाही रोटरी क्लब तर्फे चषक अशी पारतोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

You cannot copy content of this page