⚡कणकवली ता.३०-: शिक्षकांना आता केंद्रप्रमुख पदाचा निवड वेतनश्रेणीचा ग्रेड पे रु. ४९०० लाभ मिळण्यासाठी कोणतीही अडचण राहिलेली नाही. ही कार्यवाही त्वरित केल्याबाबत शिक्षक प्रतिनिधी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व त्यांचे प्रशासन यांचे आभार व्यक्त केले आहेत. अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, सोनू नाईक, रमेश आर्डेकर, भानू तळगावकर व विजय मयेकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रात दिली आहे.
जि.प. सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून
दि. २१ जून २०२२ च्या आदेशाने पदवीधर श्रेणीधारक शिक्षक, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख अशा ८५ सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. सदर आदेशात १५ केंद्रप्रमुख हे पाचव्या वेतन आयोगाच्या कालावधीत निवडश्रेणी पात्र दिनांकाला रु. ७५००-१२००० ला पात्र ठरले तसेच या आदेशातील २० शिक्षक पाचव्या व सहाव्या आयोगाच्या कालावधीतील निवडश्रेणी पात्र दिनांकानंतर केंद्रप्रमुख या पदोन्नतीच्यापदी हजर झालेले आहेत.
ग्रामविकास विभागाकडील दि. २०/०५/२००९ च्या शासन निर्णयानुसार वरील १५ शिक्षकांपैकी १३ शिक्षकांची निवड वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगाच्या दि. ०१/०१/२००६ या दिनांकाला रु. ७५००-१२००० या श्रेणीतून रु. ९३००-३४८०० (४९००) या श्रेणीत आपोआप परिवर्तित होणार होती. तसेच पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या कालावधीत मूळ निवडश्रेणीतून केंद्रप्रमुख पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या केंद्रप्रमुखांचा मूळातला ग्रेड पे रु. ४८०० ऐवजी रु. ४९०० ची शासन निर्णयातच तरतूद आहे. शिवाय हे शिक्षक केंद्रप्रमुख या पदावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील आदेशानेच पदोन्नत झाले होते. त्यामुळे अशा शिक्षकांना ग्रेड पे रु. ४९०० देण्याबाबतच्या स्वतंत्र आदेशाची आवश्यकता नव्हती अशी आजही आमची ठाम धारणा आहे कारण यापूर्वी असे पुन्हा स्वतंत्र आदेश कधीही झालेले नाहीत. यासाठी ८ जून २०२३ रोजी उपसचिव, वित्त विभाग, मंत्रालय यांच्याशी शिक्षक प्रतिनिधींची चर्चा झाली होती. संबंधित अधिकारी यांनी सिंधुदुर्गच्या वित्त विभाग व शिक्षण विभागाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता.
मात्र वित्त विभागाने या शिक्षकांसाठी ग्रेड पे रु. ४९०० देय असल्याबाबतचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश जोडावा असा आक्षेप लावून तशा आशयाचे पत्र शिक्षणाधिकारी यांना दिले. शिक्षणाधिकारी यांनी निवृत्त शिक्षकांना वेळीच लाभ मिळण्यासाठी आपल्या कार्यालयाकडून तात्काळ प्रस्ताव ठेवून तो मंजुरीस्तव सादर केला. अखेर या लाभाच्या कार्यवाहीला आणखी विलंब होऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करुन वरील शिक्षकांसाठी १३ व २० शिक्षकांचे दोन स्वतंत्र आदेश दि. १४/०७/२०२३ ने निर्गमित केले आहेत. त्यामुळे या शिक्षकांना आता केंद्रप्रमुख पदाचा निवड वेतनश्रेणीचा ग्रेड पे रु. ४९०० लाभ मिळण्यासाठी कोणतीही अडचण राहिलेली नाही. अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, सोनू नाईक, रमेश आर्डेकर, भानू तळगावकर व विजय मयेकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रात दिली आहे.
